
मकर संक्रांतीच्या वातावरणात महानगरपालिका निवडणूक होत आहे. या वेळी महिला मतदारांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे उमेदवारांचा यंदा महिला मतदारांना भेटवस्तू देण्याकडे भर आहे. मात्र त्यावर आता निवडणूक आयोगाची विशेष नजर राहणार आहे. महिलांना देण्यात येणाऱया वाणांवर आयोगाचे पथक लक्ष ठेवून आहेत. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाची पाकिटे तसेच इतर वाणांच्या वस्तूंवर उमेदवाराचे नाव असल्यास थेट कारवाई करण्यात येईल.
अहिल्यानगरमध्ये 68 नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यासाठी आता जोरदार प्रचार सुरू झाला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी बुधवारी मकर संक्रांतीचा सण आहे. संक्रांतीच्या दुसऱया दिवशी मतदान असल्यामुळे संक्रांतीच्या दिवशी रिंगणातील महिला उमेदवार एकमेकींना वाणाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या वस्तू देणार आहेत. मात्र या वाणांच्या भेट वस्तूंवर निवडणूक आयोगाचे लक्ष राहणार आहे. वाणांवर संबंधित उमेदवाराचे छायाचित्रे, नावे, चिन्ह असल्यास त्याची दखल आयोगाकडून घेतली जाणार आहे. यासाठी महानगरपालिकेच्या 17 आचारसंहिता पथकांची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवारांच्या प्रत्येक हालचालीवर विशेष लक्ष राहणार आहे.




























































