
सामना प्रतिनिधी । नाशिक
पुन्हा एकदा थंडीची लाट आल्याने नाशिक जिल्हा गारठला आहे. कळवण तालुक्यातील मानूर येथे 3.7, तर निफाडच्या कुंदेवाडीत आज 4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये पारा 7 अंशांवर घसरला आहे. तीन दिवसांपासून भरदिवसाही थंडीचा कडाका कायम आहे. थंडीच्या लाटेमुळे द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे.
उत्तरेकडील शीतलहरींमुळे पुन्हा एकदा थंडीची तीक्रता वाढली आहे. कळवणजवळील मानूर येथे शेतकरी धनंजय जाधव यांच्या खासगी ऑब्झर्वेटरीत आज 3.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले, येथे काल 9 तापमान होते. एकाच दिवसात 6 अंशांनी पारा घसरल्याने थंडीचा कडाका प्रचंड वाढला.
निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात रविवारी 6.2, सोमवारी 7, तर आज 4 अंश सेल्सिअस तापमान होते. उगावमध्ये 6 अंशांवर पारा घसरला. नाशिक शहरात रविवारी 8.1, सोमवारी 9.4, तर आज 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
द्राक्षबागा संकटात
थंडीच्या लाटेमुळे द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. आता द्राक्ष काढणीच्या स्थितीत आहेत. प्रचंड थंडीमुळे या तयार द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भिती आहे, त्यामुळे जिल्हाभर मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत शेकोटय़ा पेटवित, तसेच द्राक्षबागांना पाणी देत तापमान नियंत्रित राहावे म्हणून शेतकरी प्रयत्न करीत आहेत. तापमान आणखी घसरण्याचा अंदाज असल्याने द्राक्ष उत्पादकांसमोरील चिंता वाढली आहे.
























































