
‘थर्टी फर्स्ट’च्या पूर्वसंध्येला सक्रिय झालेल्या थंडीने मुंबई शहर आणि उपनगरांतील मुक्काम कायम ठेवला आहे. मुंबईचा पारा माथेरानइतकाच खाली घसरला असून दोन्ही ठिकाणी किमान तापमानात 16 अंशांपर्यंत मोठी घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना घरबसल्या माथेरानच्या हुडहुडीचा आनंद मिळत आहे. पहाटे थंडीचा कडाका आणखी वाढत असल्यामुळे जागोजागी शेकोटय़ाही पेटत आहेत. हा सुखद गारवा पुढील संपूर्ण महिनाभर दिवसरात्र मुक्कामी असेल, अशी ‘गुड न्यूज’ही हवामान खात्याने दिली आहे.
उत्तर हिंदुस्थान आणि उत्तर पूर्वेकडील भागातून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे मुंबई चांगलीच गारठली आहे. मागील काही वर्षांचा विचार करता शहर आणि उपनगरांत पहिल्यांदाच थंडीने आठवडाभराहून अधिक काळ आपली तीव्रता कायम राखली आहे. बुधवारी सांताक्रुझमध्ये 16 अंश किमान तापमानाची नोंद झाली. थंड हवेचे ठिकाण ओळखल्या जाणाऱ्या माथेरानमध्येही पारा याच पातळीवर होता. पुढील दोन दिवसांत मुंबईचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. मागील आठवडाभरापासून मुंबईच्या तापमानात किमान आणि कमाल अशा दोन्ही पातळय़ांवर घट होत आहे.
उत्तर महाराष्ट्रात कडाका वाढणार
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उर्वरित महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढणार आहे. दोन दिवसांनंतर उत्तर महाराष्ट्रातील गारठा वाढेल. नाशिक, जळगाव, संभाजीनगर परिसरातील किमान तापमान 10 अंशांच्याही खाली घसरेल. सध्या या भागातील बहुतांश ठिकाणी 12 ते 13 अंश किमान तापमानाची नोंद होत आहे. त्यात मोठी घट होऊ शकेल, असे हवामान खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
थंडीमुळे ‘एक्सटेंडेड’ पिकनिक प्लॅनिंग!
मुंबईसह डहाणू, अलिबाग, रत्नागिरी या कोकण किनारपट्टी भागामध्ये थंडीची तीव्रता ‘जैसे थे’ राहिली आहे. अनेक भागांमध्ये पारा 14 ते 15 अंशांच्या खाली गेला आहे. किनारपट्टी भागातील या थंडीच्या मुक्कामामुळे थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडलेल्या बहुतांश मुंबईकरांनी पिकनिक स्पॉटवरील मुक्कामही वाढवला आहे. त्यामुळे अलिबाग, डहाणू, रत्नागिरी, गुहागर परिसरातील हॉटेल्सचे बुकिंग अजूनही हाऊसफुल्ल आहे.























































