
सामना प्रतिनिधी । नाशिक
नाशिक जिल्ह्यात एकाच दिवसात तापमान दोन अंशांनी घसरले असून, पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. निफाडजवळील कुंदेवाडी येथे आज किमान तापमानाचा पारा 4 अंशांवर घसरला. निफाडचे उगाव आणि कळवणजवळील मानूर येथे 5, तर नाशिक शहरात 7.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
निफाड तालुक्यातील उगाव येथे 30 डिसेंबरला किमान तापमान शून्य अंश सेल्सिअस नोंदविले गेले. निफाडजवळील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 27 डिसेंबरला 1.8 तापमान होते. कळवणच्या मानूरमध्ये 29 डिसेंबरला 1.9 अंशावर पारा घसरला होता. जिह्यात 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत दवबिंदू गोठल्याने रब्बी पिके व द्राक्षांचे नुकसान झाले होते.
जिह्यात चार दिवसांनंतर आज पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. सर्वत्र किमान व कमाल तापमान दोन अंशांनी घसरले आहे. निफाडला किमान 4 तापमान होते. उगाव येथे 5 अंशावर पारा घसरला, अशी माहिती शेतकरी तुषार कोल्हे यांनी दिली. कळवणजवळील मानूर येथेही तापमान 5 इतके नोंदविले गेले आहे. नाशिक शहरात किमान 7.6 व कमाल 26.6 तापमान होते. वाढत्या थंडीमुळे पहाटे द्राक्षबागांमधील तापमान नियंत्रित करण्यासाठी शेकोटय़ा पेटविल्या जात आहेत. त्याचबरोबर बागांना पाणी देत द्राक्ष वाचविण्यासाठी शेतकऱयांची धडपड सुरू आहे.





























































