गारठ्याचे वातावरण गहू, हरभरा, कांद्यास पोषक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, धुळे

जिल्हय़ात तापमानाचा पारा दहा अंश सेल्सियसपर्यंत खाली आला असल्यामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे. गारठा आणि हवेतील आर्द्रतेमुळे गहू, हरभरा आणि कांदा पिकास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वातावरणातील गारठा अजून काही दिवस कायम राहील तर गव्हाच्या ओंबीतील दाणा आणि हरभऱयाचा दाणा भरण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकऱयांना अपेक्षित उत्पन्न येईल. यंदा अपेक्षित प्रमाणात पाउस झालेला नसल्याने शेतकऱयांनी रब्बी हंगामातील पिकांचे क्षेत्र कमी केले आहे. तापमानाचा पारा महिनाभर स्थिर राहिल्यास कमी पाण्यातही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळेल असा आशावाद राजेंद्र माळी या शेतकऱ्याने व्यक्त केला.

धुळे जिल्हय़ात सलग चौथ्या वर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. परिणामी तालुक्यासह इतर भागातील शेतकऱयांनी रब्बी हंगामातील क्षेत्र कमी केले आहे. धुळे शहराजवळील वरखेडी, कापडणे, कुंडाणे, धनुर, नगाव, कुसुंब्यासह साक्री आणि शिरपूर तालुक्यातील शेतकऱयांनी रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि कांदा पिकाची पेरणी केली आहे. गेल्या 15 दिवसांपासून तापमानाचा पारा कमी होण्यास सुरुवात झाली. आठ दिवसांपासून तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली आहे. त्याचवेळी हवेती आर्द्रतेचे प्रमाण सरासरी 80 टक्क्यावर आले आहे.

दिवसभर गारठा राहत असल्याने उन्हाची तीव्रता फारशी जाणवत नाही. हवेत गारठा असताना आकाश निरर्भ राहते. परिणामी गहू, हरभरा आणि कांदा पिकास पोषक वातावरण तयार झाले आहे. वातावरण असेच काही काळ राहिले तर गव्हाच्या ओंबीतील दाणा आणि हरभऱयाचा दाणा भरण्यास मदत होणार आहे. दाणे वजनदार झाल्यामुळे उत्पादन जास्त येईल. शिवाय अशा वातावरणात पिकांची वाढ जोमदार होते. यंदा पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱयांनी विहिरीत असलेल्या पाण्याचा अंदाज घेऊन रब्बीच्या पिकाखालील क्षेत्र घटविले आहे. कमी क्षेत्रात पिके घेतली आणि वातावरण स्थिर राहिल्यास समाधानकारक उत्पन्न मिळेल.