
सामना ऑनलाईन, मुंबई
प्राध्यापकांची भरती तातडीने करावी, यापूर्वीच्या 71 दिवसांच्या बहिष्कार आंदोलन काळातील रोखलेले वेतन द्यावे आदी मागण्यांसाठी राज्यभरातील 25 हजारांवर प्राध्यापक आजपासून बेमुदत संपावर गेले. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. परीक्षा सुरू असतानाच प्राध्यापक संपावर गेल्याने विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत आहे. दरम्यान, प्राध्यापकांच्या मागण्यांवर लवकरच तोडगा निघेल असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी ऍण्ड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन या प्राध्यापकांच्या संघटनेने हा संप पुकारला आहे. यापूर्वी आपल्या मागण्यांसाठी जेल भरो, सामूहिक रजा आंदोलन करूनही न्याय न मिळाल्याने बेमुदत संप पुकारावा लागत असल्याचे या संघटनेने म्हटले आहे. प्राध्यापकांच्या संपामुळे राज्यातील 11 विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये आज प्राध्यापकांची संख्या नगण्य होती.
मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये या संपाचा परिणाम जाणवला. परीक्षा सुरू असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांनी हजेरी न लावता परीक्षा घेतल्या. सकाळच्या सत्रात आलेल्या विद्यार्थ्यांना संप असल्याचे कळताच पुन्हा माघारी जावे लागले. सकाळी दहा वाजल्यानंतर बहुतांश महाविद्यालये बंद करण्यात आली.
दरम्यान, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने या संपाला पाठिंबा दिलेला नाही. बेमुदत संप करून विद्यार्थ्यांना वेठीस धरणे तसेच प्राध्यापकांचे नुकसान करणे हा पर्याय नसून संवैधानिक मार्गाने मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजेत असे मत व्यक्त करत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक – विनोद तावडे
प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज प्राध्यापकांच्या विविध संघटनांना दिले आहे. सातवा वेतन आयोग, पद भरती, 71 दिवसांच्या प्राध्यापकांच्या संपकाळातील वेतन, विनाअनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांचे वेतन या विषयांवर तावडे यांनी प्राध्यापक संघटनांशी चर्चा केली. या मागण्यांवर लवकरच तोडगा निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



























































