हरवलेलं संगीत (भाग 2) : अपनी अपनी किस्मत है…

281

>>शिरीष कणेकर

विनोद ऊर्फ एरिक रॉबर्टस्. तुम्ही दोन्ही नावं ऐकली नसणार. तुम्ही ऐकली नाहीत व मी ऐकलीत, म्हणजे मी तुमच्यापेक्षा शहाणा, तुमच्यापेक्षा जाणकार व तुमच्यापेक्षा दर्दी असा राग आणणारा अर्थ कृपया काढू नये. तुमच्यापेक्षा शहाणा ठरून, तुमच्यावर मात करून मला काय मिळणार आहे? वसंत देसाईंचं ‘हैदराबाद की नाजनीन’मधलं लताचं ‘जाओ चमका सुबह का सितारा’ ऐकलेलं नव्हतं. शेवटी ऐकलं व खुळावल्यासारखा झालो. मला सांगा, वसंत देसाई हे मोठं नाव. त्यांचे ‘झनक झनक पायल बाजे’ व ‘गुंज उठी शहेनाई’मधील संगीत दुमदुमलं. मग ‘जाओ, चमका सुबह का सितारा’ एवढं दुर्लक्षित, उपेक्षित कसं राहिलं? पटण्यासारखं कारण द्या.

संगीतकार कल्याणजी (वीरजी शहा) याबाबत मनोरंजक थिअरी मांडायचा. त्याच्या मते काही ठरावीक रागांवर बेतलेली गाणी हमखास लोकप्रिय होतात व काही रागांवर आधारित गाणी कितीही चांगली असली तरी अप्रसिद्ध राहतात. ‘जाओ, चमका सुबह का सितारा’ त्यातलंच एक दुर्दैवी गाणं असू शकेल. ते कल्याणजीलाही माहीत नव्हतं. म्हणजेच काही राग शापित म्हणावे लागतील.

काही संगीतकारही असेच शापित होते. त्यांची काही गाणी उत्तम होती. अगदी नौशाद, मदन मोहन, एस. डी. बर्मन, सी. रामचंद्र, अनिल विश्वास, सज्जाद यांच्यापेक्षा तसूभर कमी भरणार नाहीत अशा अप्रतिम रचना त्यांनी गुंफल्या होत्या. मग पुढे काय झालं त्यांचं? ते प्रमुख प्रवाहात का येऊ शकले नाहीत? त्यांना मोठे हीरो, मोठे ‘बॅनर’ का मिळाले नाहीत? ते ‘ऑलसो रॅन’ का ठरले? दोन-चार गाण्यांतच त्यांची प्रतिभा कशी संपली? त्यांच्या ललाटी अपयश व विस्मृतीत जाणं लिहिलं होतं का?

विनोद ऊर्फ एरिक रॉबर्टस्च्या हृदयद्रावक कहाणीकडे वळूया. एरिक रॉबर्टस् नावाचा एक ख्रिश्चन युवक लाहोरहून मुंबईला आला. संगीतकार म्हणून त्यानं विनोद हे सुटसुटीत, गोड नाव धारण केलं. काही गाण्यांना त्यानं होश उडवून देणाऱया चाली दिल्या. रसिकांच्या कानांवर त्यानं गारुड केलं. ‘एक थी लडकी’ (साल 1949) हा विनोदचा सर्वात यशस्वी चित्रपट. त्यातलं ‘लारेलप्पा लारेलप्पा’ (लता मंगेशकर-जी. एम. दुराणी व कोरस) हे त्या दशकातील सर्वात लोकप्रिय गाणं होतं. ‘घिर घिर के आयी बदरिया’ (लता), ‘अब हाले दिल या हाले जिगर’ (लता व रफी) व ‘ये शोख सितारे’ (लता व रफी) ही तीन गाणीही केवळ अप्रतिम होती. वास्तविक ‘एक थी लडकी’नंतर विनोदचा रथ वेगानं दौडत निघायला हवा होता, पण दुर्दैवानं तसं झालं नाही. ‘शेखचिल्ली’, ‘मुखडा’, ‘फॉर लेडीज ओन्ली’, ‘आग का दरिया’, ‘रम्मण’, ‘गरमागरम’, मख्खीचूस’, ‘नगद नारायण’ असल्या चिल्लर चित्रपटांत तो अडकून पडला. त्यात लताचं एकही गाणं नव्हतं हा योगायोग समजायचा की विनोदच्या अपयशाचं एक कारण समजायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. सगळीकडून घुसमट होत असतानाही विनोदनं लताकडून ‘कागा रे’, ‘अपनी अपनी किस्मत है’ (‘वफा’), ‘मेरी बरबादियों का तमाशा’, ‘मेरे दिल के तडपने का तमाशा देखनेवाले’ (‘सब्जबाग), ‘मेरी उल्फत सोयी है यहां’ व ‘मोहब्बतने कैसे कैसे दिये हमको धोके’ (‘उटपटांग’) ही अफलातून गाणी गाऊन घेतली. ‘मेरे घुंगट में दो नैन’ (लता), ‘तारे वही है’ (लता), ‘याद आनेवाले’ (लता व तलत), ‘दर्द मिला है’ (लता), ‘जब किसी के रूख पे’ (तलत), ‘मोरे द्वार खुले है’ (लता) ही गाणी ‘अनमोल रतन’मध्ये होती. लताच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांत ‘कागा रे’ न घेऊन दाखवाच. काळाच्या ओघात ‘कागा रे’ विसरलं गेलं व विनोदचं नावही पटलावरून पुसलं गेलं. अशोक कुमार, दिलीप कुमार, राज कपूर व देव आनंद यातला एकही हीरो त्याला मिळू नये या दुर्दैवाला काय म्हणावं? त्यानेच त्याच्या एका गाण्यात म्हटलंय, ‘अपनी अपनी किस्मत है, आबाद कोई, बरबाद कोई…’

यशस्वी संगीतकारांची काही उत्कृष्ट गाणी अप्रसिद्ध राहावीत याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. ती का नसतील गाजली? नमुन्यादाखल ही काही गाणी पहा
– अनिल विश्वास ः ‘आँखो में चितचोर समाये’, ‘मेहमान’ – लता मंगेशकर
– हेमंत कुमार ः ‘प्यार की दास्ता तुम सुनो तो’, ‘फरार’ – लता मंगेशकर
– शंकर-जयकिशन ः ‘बता ऐ दिल’, ‘पूजा’ – लता मंगेशकर
– नौशाद ः ‘न रो ऐ दिल’, ‘उडन खटोला’ – लता मंगेशकर
– रोशन ः ‘उनको अपना बना के छोड दिया’, ‘मालकीन’ – लता मंगेशकर
– मदन मोहन ः ‘कल जलेगा चांद’, ‘निर्मोही’ – लता मंगेशकर
– हुस्नलाल-भगतराम ः ‘तेरी यादमे रो रो मरी’, ‘काफिला’ – लता मंगेशकर
– सी. रामचंद्र ः ‘टुटी फुटी गाडी’, ‘निराला’ – लता मंगेशकर
– सुधीर फडकेः ‘तुम्हे बांधने के लिए’, ‘रत्नघर’ – लता मंगेशकर

याचा अर्थ एकच. प्रत्येक संगीतकाराचं नशीब तर असतंच, पण त्याच्या प्रत्येक गाण्याचं स्वतःचं असं स्वतंत्र नशीब असतं. म्हणूनच अनेकांनी नाकारलेलं ओ. पी. नय्यरचं ‘लेके पहेला पहेला प्यार’ अखेर सीआयडीत जाऊ शकलं व ते अख्खा चित्रपट कुठल्या कुठे घेऊन गेलं. ‘महल’मधलं खेमचंद प्रकाशचं ‘आयेगा आनेवाला’ निर्माता सावक वाच्छाला पसंत नव्हतं. ‘आयेगा आयेगा, कब आयेगा?’ असं तो रेकॉर्डिंगमध्ये ओरडला. ते सहन न होऊन रागावलेला खेमचंद प्रकाश रेकॉर्डिंग सोडून निघून गेला (नंतर परत येऊन त्यानं ‘आयेगा आनेवाला’ रेकॉर्ड केलं). ‘आयेगा आनेवाला’नं इतिहास घडवला. आज ‘महल’ त्या एका झपाटून टाकणाऱया गाण्यामुळे ओळखला जातो.

संगीतातलं ‘ओ’ की ‘ठो’ न कळणारे निर्माते त्याही काळी होते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या