प्रश्नपत्रिकेतच उत्तर लिहिण्यासाठी जागा हवी, दहावीच्या भाषा विषय शिक्षकांची मागणी

284
exam-pattern
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

दहावीच्या भाषा विषयांच्या तोंडी परीक्षा पुन्हा घेण्याच्या निर्णयाचे विद्यार्थी-पालकांसह शिक्षकांनी स्वागत केले असले तरी काही शिक्षकांनी कृतिपत्रिकेचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. तीन तासांत कृतिपत्रिका सोडवून पूर्ण होत नाही अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. त्यामुळे कृतिपत्रिका सोडविण्यासाठी वेगळी उत्तरपत्रिका देण्याऐवजी प्रश्नपत्रिकेतच उत्तरे लिहिण्यासाठी जागा द्यायला हवी, अशी मागणी होत आहे.

मार्च 2020 मध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांसाठी 100 गुणांऐवजी 80 गुणांची लेखी परीक्षा द्यायची आहे. मात्र यातील बरेच प्रश्न हे विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यावर आधारित असल्याने द्वितीय भाषा मराठीचा पेपर सोडविताना अमराठी विद्यार्थ्यांची गोची होते. बरेचसे मराठी शब्द त्यांना माहिती नसतात. तसेच त्यांचे लेखनकौशल्यही सामान्य असते. या विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागावी, यासाठी कृतिपत्रिकेची काठीण्य पातळी कमी करण्याची मागणी हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी केले आहे.

तरच दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा वेळ पुरेल

दहावीच्या भाषा विषयांच्या 80 गुणांच्या परीक्षेसाठी तीन तासांचा अवधी आहे, पण हा वेळदेखील बहुसंख्य विद्यार्थ्यांना पुरत नाही. कृतिपत्रिकेनुसार विद्यार्थ्यांना लेखनकौशल्य वापरून उत्तरे लिहायची असल्याने विद्यार्थ्यांना बराच वेळ हा विचार करून उत्तरे लिहिण्यात जातो. त्यामुळे कृतिपत्रिकेतच (प्रश्नपत्रिकेत) उत्तरे लिहिण्याची जागा सोडली तर विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाचेल, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. तसेच उत्तरपत्रिका छपाईचा खर्चही काही प्रमाणात कमी होणार आहे.

  • अपठित गद्य या विषयावर सारांश लेखनासाठी 5 गुण आहेत. हा प्रश्न काही विद्यार्थ्यांना कठीण जात आहे.
  • व्याकरणातील अलंकार, समास, पाचवी ते नववीपर्यंतचे व्याकरण या घटकांवर विचार करणे आवश्यक आहे.
  • कवितेवर प्रश्न विचारताना रसग्रहण, रसास्वाद यासंदर्भात अमराठी विद्यार्थी लक्षात घेऊन सुलभ प्रश्न विचारले जाण्याची गरज आहे.
आपली प्रतिक्रिया द्या