प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहला अटक, एनसीबीच्या धाडीत घरात सापडला गांजा

खासगी वाहिन्यांवरील प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह हिला एनसीबीने शनिवारी ड्रग्ज प्रकरणात अटक केली. एनसीबीने तिच्या मुंबईतील तीन घरांवर छापा टाकला होता. त्यावेळी तिच्या घरात 86 ग्रॅम गांजा सापडला होता. नंतर दिवसभर चौकशी केल्यानंतर सायंकाळी भारतीला अटक करण्यात आली. दरम्यान, भारतीचा पती हर्ष लिंबाचिया याचीही रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

एनसीबीच्या पथकाने शनिवारी सकाळीच भारतीच्या अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा येथील तीन फ्लॅटस्ची झाडाझडती घेतली. यावेळी घरात गांजाचा साठा सापडला. त्यामुळे एनसीबीने दोघांना समन्स बजावून चौकशीसाठी ताब्यात घेतले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज रॅकेट प्रकरणात एका ड्रग पेडलरच्या चौकशीत भारती व हर्ष या कॉमेडियन दांपत्याची नावे पुढे आली. दोघांनी ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. त्या माहितीच्या आधारे एनसीबीचे पथक शनिवारी सकाळीच भारतीच्या फ्लॅटवर पोहोचले. तिच्या तिन्ही फ्लॅटस्ची काही तास कसून झाडाझडती घेण्यात आली. ही कारवाई सुरू असताना भारती व हर्ष हे दोघे घरीच होते. झडतीत त्यांच्या घरात 86 ग्रॅम गांजा सापडला. नंतर त्यांना समन्स बजावून एनसीबीचे अधिकारी दोघांनाही आपल्या कार्यालयात घेऊन गेले. भारती आणि हर्ष या दोघांनीही चौकशीत गांजा घेत असल्याची कबुली दिल्याचे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले.

कोण आहे भारती सिंह?

भारती सिंह ही स्टॅण्डअप कॉमेडियन व टीव्ही अभिनेत्री आहे. ‘द कपिल शर्मा शो’मुळे ती लोकप्रिय बनली. तिने 2017 मध्ये हर्ष लिंबाचियाशी लग्न केले. ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी सर्कस महासंग्राम’, ‘काॉमेडी सर्कस का जादू’, ‘कहानी कॉमेडी सर्कस की’ आणि ‘कॉमेडी नाइटस् बचाओ’ अशा शोमध्ये तिने काम केले आहे.

अनेक सेलिब्रिटींची झालीय चौकशी

बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटच्या चौकशीत आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीमुळे बॉलीवूड आणि ड्रग्ज रॅकेटची लिंक उघड झाली. पुढे दीपिका पदुकोण, सारा अली खान, रपुल प्रीत सिंह, अर्जुन रामपाल व त्याची लिव्ह-इन पार्टनर गॅब्रिएला डेमेटिडस् अशी नवनवीन नावे एनसीबीच्या रडारवर आली.

आपली प्रतिक्रिया द्या