जिगरबाज कमांडोंनी 300 नक्षलवाद्यांना पिटाळून लावले, एका नक्षल्याचा खात्मा

519

नक्षलग्रस्त गडचिरोलीतील भामरागड नजीकच्या अबूजमाड जंगलात लपून बसलेल्या 200 ते 300 सशस्त्र नक्षलवाद्यांचा हल्ला परतवून त्यांना पिटाळून लावण्यात गडचिरोली पोलीस कमांडोंना सोमवारी यश आले. या चकमकीत पोलिसांनी एका नक्षल्याला गोळीने टिपले. मात्र पोलिसांचा प्रतिकार पाहून नक्षलवाद्यांनी आपल्या मयत साथीदाराचा मृतदेह घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

भामरागड परिसरातील लाहेरी हद्दीपासून 40 किलोमीटरवरील नक्षल्यांचा गड असलेल्या अबुजमाड जंगल परिसरात नक्षल्यांकडून हल्ल्याची योजना आखण्यासाठी तळ उभारण्यात आला आहे. या तळावर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलातील सी-60 कमांडो पथकाने अपर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या नेतृत्वाखाली बेधडक कारवाई केली. नक्षलवाद्यांचा म्होरक्या सोनू ऊर्फ भूपती याने हा तळ उभारला होता.

त्याचवेळी नक्षलवाद्यांनी एके 47 आणि एलएमजी आदी अत्याधुनिक रायफलने कमांडोंवर बेछूट गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलीस जवानांनी केलेल्या कारवाईत एक नक्षलवादी ठार झाला. त्यानंतर जवानांवर गोळीबार करून ठार झालेल्या नक्षल्याचा मृतदेह घेऊन नक्षलवाद्यांनी तेथून पळ काढला.

आपली प्रतिक्रिया द्या