शिक्षक, प्रशिक्षकांच्या ऋणातून मी उतराई होऊ शकणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रकुल रौप्यपदक विजेता धावपटू अविनाश साबळेने व्यक्त केली कृतज्ञता

पॅण्डीमॅन आयोजित गौरव सोहळ्यात राष्ट्रकुल पदक विजेत्यांचा सन्मान

बीड जिह्यातील एका छोटय़ाशा गावातून येत आज मी आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकलोय याचे सारे श्रेय माझे शाळेतील शिक्षक आणि आताचे क्रीडा प्रशिक्षक यांनाच द्यावे लागेल. त्यांनी मला शून्यातून शिखरावर पोचण्यासाठी मदत केलीय. त्यांच्या ऋणातून मी आयुष्यभर उतराई होऊ शकणार नाही, अशी कृतज्ञता बार्ंमगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अडथळा शर्यतीचे (स्टीपल चेस) रौप्यपदक पटकावणारा धावपटू अविनाश साबळे याने व्यक्त केली आहे. पॅण्डीमॅन चोकोबार आणि आयटीसी आयोजित शिक्षक गौरव आणि क्रीडापटू गौरव सोहळ्यात तो बोलत होता.

बीकेसीतील सोफीटेल हॉटेलात आयटीसीने आयोजित केलेल्या विशेष सन्मान सोहळ्यात बार्ंमगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत अडथळा शर्यतीचे रौप्यपदक पटकावणारा मराठमोळा अविनाश साबळे आणि महिला गटात ज्युडोचे रौप्यपदक पटकावणारी मणिपूरची सुशीलादेवी यांचा आयटीसी इंडियाच्या चोकोलेटस्, कॉफी आणि कन्फेक्शनरी फूड्स डिव्हिजनचे चीफ सीईओ अनुज रस्तोगी यांच्या हस्ते भेटवस्तू, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पॅण्डीमॅन चोकोबारच्या मदतीने सोफीटेल सभागृहात शिक्षकांसाठी विश्वविक्रमी जायन्ट शुभेच्छापत्र तयार करणारे लाईफ ऑफ ट्रस्ट या एनजीओचे विद्यार्थी आणि शिक्षकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. पॅण्डीमॅनच्या या भव्यदिव्य शुभेच्छापत्राची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’नेही घेतली आहे.

केनियन धावपटूंना टक्कर देऊन पदक मिळवल्याचा आनंद -साबळे

कोरोनासारख्या आजारावर मात करीत मी राष्ट्रकुल स्पर्धेसाठीची पूर्वतयारी केली होती. माझे प्रशिक्षक जयवीर सिंह यांचे मोलाचे मार्गदर्शन मला लाभले. शिवाय देशवासीयांच्या लाखो शुभेच्छा माझ्या पाठीशी होत्या. त्यामुळेच अनुभवी आणि जगविख्यात केनियन धावपटूंना मागे टाकत मी देशासाठी राष्ट्रकुल अडथळा शर्यतीचे रौप्यपदक पटकावू शकलो याचा आनंद शब्दांत सांगता येणार नाही, असे सांगून अविनाश साबळे म्हणाला, आता अनुभवाने मी अधिक सुसज्ज झालो आहे. अनुभवाच्या कमतरतेमुळे मला राष्ट्रकुल सुवर्ण पदकाला केवळ अर्ध्या सेपंदाने मुकावे लागलेय हे मी विसरणार नाही. साबळेसोबत राष्ट्रकुल स्पर्धेत महिला ज्युडोचे रौप्यपदक पटकावणारी मणिपूरची सुशीलादेवी आणि तिचे प्रशिक्षक जीवन शर्मा यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.