चिपळुणातील कंपनी मालकाची 2 लाख 44 हजारांची ऑनलाईन फसवणूक

लोटे येथील एका कंपनी मालकाची 2 लाख 44 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी शनिवारी चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद राजकुमार पुखराज जैन (वय 52, मूळ रहिवासी – कोल्हापूर, सध्या रा. राधाकृष्णनगर, चिपळूण) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने राजकुमार जैन यांच्या कंपनीचे मागील पाण्याचे बिल अपलोड झालेले नाही, त्यामुळे पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असा मजकूर असलेला संदेश त्यांच्या व्हॉट्सॲपवर पाठवला. त्यानंतर संबंधिताने एक ॲप पाठवून ते डाऊनलोड करण्यास सांगितले व त्यामध्ये आवश्यक माहिती भरण्यास सांगितले.
या ॲपवर जैन यांनी त्यांच्या डेबिट कार्डची माहिती भरताच त्यांच्या खात्यातून अनुक्रमे 45 हजार रुपये आणि 1 लाख 19 हजार रुपये असे व्यवहार झाले. यातून एकूण 2 लाख 44 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जैन यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार शनिवारी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.