
सामना ऑनलाईन । मालवण
राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेतील स्पर्धक महिला सुरेखा संजय गलांडे (48, कार्तिकनगर नाशिक) या शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास चिवला बिच समुद्रात पोहण्याचा सराव करताना अचानक बुडाल्या. तातडीने स्थानिक युवकांनी त्यांना समुद्रातून बाहेर काढत रुग्णवाहिकेतून ग्रामीण रूग्णालयात हलविले. पुढील उपचारासाठी शहरातील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पवार करीत आहेत.
सुरेखा गलांडे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. त्या आणि त्यांचा मुलगाही स्पर्धेतील स्पर्धक होते. मुलगा गतीमंद गटातून सहभागी होणार होता. शनिवारी सकाळी गलांडे या स्पर्धेसाठी सराव करण्यासाठी चिवला बिच समुद्रात उतरल्या. समुद्रात काही अंतर गेल्यानंतर त्या अत्यवस्थ होऊन बुडू लागल्या. एक स्पर्धक बुडत असल्याचे पाहून स्थानिकांनी त्यांना बाहेर काढले. तात्काळ रूग्णवाहिका बोलावून त्यांना ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आले. ताता मसुरकर, मनोज मेतर, रोहित मेतर, रुजाय फर्नाडीस, फ्रान्सिस फर्नाडीस, जॉन्सन रॉड्रिक्स, पावलू सोज, किशोर वेंगुर्लेकर, राकेश वेंगुर्लेकर, नागेश मसुरकर, रिचर्ड सोज, बस्त्यावं फर्नाडीस आदी स्थानिक स्पर्धक होते. पाच ते सहा बोटींच्या साहाय्याने महिलेला समुद्रातून बाहेर काढण्यात आले.
ग्रामीण रूग्णालयातून गलांडे यांना तातडीने खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्याठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महिलेच्या उपचारासाठी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक यतीन खोत, शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी तसेच इतर स्थानिक नागरिक यांनी मदत केली. महिलेच्या कुटुंबियांना या घटनेची तातडीने माहिती देण्यात आली आहे.



























































