
सामना ऑनलाईन । जालना
हवामान खात्याचे अंदाज खरे ठरतात केव्हा असा देशातील अनेकांना प्रश्न पडतो. चुकांसाठी त्यांना कोणीही जबाबदार धरत नसल्याबद्दल जोकही फिरायला लागलेत. मात्र हा गंभीर प्रकार असून हवामान खात्याचे चुकणारे अंदाज शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ असल्याचं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हवामान खात्याविरोधात पोलीस तक्रार केली आहे. हवामान खाते तसेच स्कायमेट यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
हवामान खाते आणि स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र आजमितीला मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई व दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकरी हवामान खात्याच्या अंदाजावर अवलंबून रहात पेरण्या करतात. मात्र अंदाज खोटा ठरल्याने या शेतकऱ्यांच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. हवामान खात्याने आत्तापर्यंत जाहिर केलेला अंदाज खोटा ठरल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे.
तक्रारीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष माणिकराव कदम यांनी आरोप केला आहे की हवामान खातं आणि स्कायमेट हे खते, बियाणे आणि औषध उत्पादक कंपन्यांच्या फायद्यासाठी खोटे अंदाज जाहीर करीत आहेत.



























































