बोर्डाच्या हेल्पलाइनवर तक्रारींचा पाऊस; विद्यार्थ्यांना चिंता बदललेल्या ‘पेपर पॅटर्न’ची

87
exam-pattern
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

बोर्डाच्या हेल्पलाइनवर बारावी परीक्षेसंबंधी असंख्य समस्या आणि तक्रारींचा पाऊस सुरू आहे. पहिलाच पेपर इंग्रजी विषयाचा पार पडला. बारावीच्या काही विषयांचा पेपर पॅटर्न बदलला असून बहुसंख्य कॉल्स हे बदललेल्या ‘पेपर पॅटर्न’ विषयी विचारणा करणारे येत असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागातील समुपदेशकांनी सांगितले. परीक्षा काळात विद्यार्थी पालकांना भेडसावणाऱया समस्या सोडविण्यासाठी बोर्डाच्या वतीने हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच समुपदेशकांची नेमणूकही केली आहे. परीक्षेचे वेळापत्रक, बैठक व्यवस्था, हॉलतिकीट याविषयीचे प्रश्न विचारण्यात येऊ नयेत असे बोर्डाने जाहीर केले तरीही असंख्य विद्यार्थी हेच प्रश्न विचारत आहेत.

लेटलतिफ सहा विद्यार्थी परीक्षेला मुकले

परीक्षाकेंद्रावर उशिरा पोहोचलेल्या मुंबई विभागातील सहा विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले आहे. या विद्यार्थ्यांना आता पुरवणी परीक्षेला बसता येणार आहे. विद्यार्थ्यांना साडेदहा वाजता परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. 11.20 पर्यंत आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची सूट होती मात्र हे विद्यार्थी खूपच उशिरा आले होते.

इंग्रजीच्या परीक्षेतील ‘रायटिंग स्किल’चा ताप

गुरुवारी बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर पार पडला. यातील एक प्रश्न असा की,‘इंग्रजीतील लेटर रायटिंग या प्रश्नाचे उत्तर आता ईमेलच्या पद्धतीने म्हणजेच डाव्या बाजूने समास सोडून लिहायचे आहे. आधी उजव्या बाजूने समास सोडण्याची पद्धत होती. यात विद्यार्थ्यांचा गोंधळ होत असून या विषयासंबंधीचे अनेक प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. याशिवाय फिजिक्स, केमिस्ट्रीची भीती वाटतेय. शेवटच्या क्षणी अभ्यास कसा करू, असे प्रश्नही विद्यार्थी विचारत आहेत.

बारावीची इंग्रजी विषयाची परीक्षा गुरुवारी राज्यभर सुरळीत पार पडली.  राज्यभरात कॉपीची 75 प्रकरणे उघडकीस आली. सर्वाधिक कॉपी संभाजीनगरात आढळली. येथे कॉपीची 26 प्रकरणे घडली, तर मुंबई विभागात एकच कॉपी घडली आहे. लातूर आणि कोकण विभागात कॉपी झाली नाही.

मागील 10-12 दिवसांपासून विद्यार्थ्यांचे कॉल्स येत आहेत. सुरुवातीला परीक्षेच्या वेळापत्रकाची खात्री करून घेण्यासंबंधीचे कॉल येत होते, पण आता बदललेल्या पेपर पॅटर्नविषयीचे असंख्य कॉल्स येत आहेत. तोंडी परीक्षा यंदा नसल्यामुळे लेखी परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळविण्याचे विद्यार्थ्यांना टेन्शन असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसत आहे.

अशोक सरोदे, समुपदेशक, मुंबई विभागीय शिक्षण मंडळ

आपली प्रतिक्रिया द्या