
गोरेगाव पूर्वेतील महानगरपालिका अंतर्गत रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा व नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत शिवसेनेने आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी. रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच स्थानिक रहिवाशांनी मांडलेल्या समस्या ऐकून घेऊन त्या रस्ते बांधणीच्या आराखडय़ात समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले.
गोरेगाव प्रभाग क्र. 54 मधील सुरू असलेल्या महानगरपालिका अंतर्गत कामाचा पाहणी दौरा नगरसेवक अंकित प्रभू यांनी आज केला. त्यांनी पांडुरंगवाडी येथील रोड क्रमांक 1 ते 5, उमिया माता मंदिर येथील रस्ते व सेंट थॉमस परिसर येथील रस्त्यांची महानगरपालिकेच्या रस्ते विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली. पांडुरंगवाडीतील पाचही रस्त्यांचे, उमिया माता मंदिर येथील रस्ते व सेंट थॉमस परिसरातील रस्त्यांचे काम दर्जेदार पद्धतीने तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी विधानसभा संघटक प्रवीण माईणकर, स्नेहा गोलतकर, मनसे नेते सुनीता चुरी, उपविभागप्रमुख सुधाकर देसाई, शाखाप्रमुख अजित भोगले, दीपक रामाणे, मनसे शाखा अध्यक्ष मंगेश पवार, अमोल अपरात, किशोर देशपांडे उपस्थित होते.

























































