अतुर्ली येथे कम्प्रेसरच्या स्फोटात, चार जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुक्ताईनगर

तालुक्यातील अंतुर्ली येथे केळ्यांच्या गोदामातील एसीच्या कम्प्रेसरच्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता कि या शीतगृहात काम करणाऱ्या तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एका मजुराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शिवाजी दगडु साळुंखे (३०) निवृत्ती पाटील (३५), शरिफ शेख कालु (३५) अशी मृतांची नावे आहेत. तर शेख हमीद शेख हबीब असे जखमींपैकी एकाचे नाव आहे.

अंतुर्ली या गावी मोठ्य प्रमाणावर केळीचे उत्पादन घेतले जाते. रावेर तालुक्याबरोबर केळीचे आगर म्हणून अंतुर्ली गावही प्रसिद्ध आहे. या गावात एका गोदामात केळी पिकविण्यासाठी आयएफसी कंपनीचे एसी लावले आहेत. नेहमी प्रमाणेच बुधवारीही मजुर या गोदामात काम करीत होते. त्याचवेळी दुपारी अचानक एसीच्या कम्प्रेसरचा स्फोट झाला. यात चार मजुराचा मृत्यू झाला. तर अन्य सहाजण जखमी झाले आहेत. जखमींना बुरहाणपुर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतांना यातील एका मजुराचा मृत्यू झाला. हे शितगृह शे.लूकमान शे. इस्माईल यांच्या मालकीचे आहे. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता.