
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा गेली 14 वर्ष चर्चेचा चेष्टेचा विषय बनला आहे. मात्र तळेकांटे-संगमेश्वर ते तूरळ या दरम्यानचा प्रवास सध्या जीवघेणा ठरत असून हा महामार्ग अक्षरशः ‘मृत्यूमार्ग’ बनला आहे. खड्ड्यांच्या तडाख्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून प्रवाशांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागासह ठेकेदाराविषयी संताप व्यक्त होत आहे.
सदर मार्गावर डांबरीकरणाचे थर उखडून गेले आहेत. काही ठिकाणी मातीचे ढिगारे रस्ता उंचावतात तर ठिकठिकाणी खोलगट खड्डे जीवघेणे ठरत आहेत. पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून ते आणखी धोकादायक बनले आहे. धावत्या वाहनांमुळे हे मातीमिश्रित पाणी पादचाऱ्यांवर उडत असल्याने वादावादीचे प्रसंगही वाढले आहेत. चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग सर्वाधिक धोकादायक ठरत आहे.
खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू असून वाहनांचे टायर, इंजिन व इतर भागांचे नुकसान होणे, प्रवासात खोळंबा होणे हे प्रकार आता नेहमीचे झाले आहेत.स्थानिकांचे म्हणणे आहे की, अर्धवट सोडलेले काम, निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण, पावसाळ्याआधी नियोजनाचा अभाव आणि ठेकेदारांची बेजबाबदार वृत्ती यामुळेच हा महामार्ग राखडला आहे. प्रशासन व संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष ही परिस्थिती अधिकच भयावह करणारी आहे.
संगमेश्वर परिसरातील अवस्था बिकट
संगमेश्वर परिसरात राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत बेजबाबदारपणे सुरु असून रामकुंड येथील वळणावर भर पावासात काम सुरु असल्याने महामार्गावर चिखल येवून अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे. काम वेगाने करण्यासाठी प्रसंगी रस्ता बंद ठेवला जात आहे. या कामावर अभियंत्यांचे लक्ष नसल्यामुळे कामाचा दर्जाही राखला जात नसल्याचे दिसून येत आहे. संगमेश्वरच्या दुतर्फा महामार्गाची स्थिती अत्यंत भयावह झाली असून याकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष खेदजनक आहे.
वैभव मुरकर, सामाजिक कार्यकर्ता संगमेश्वर