2020 मध्ये कंडोम, रोलिंग पेपरची मागणी वाढली; ‘या’ पदार्थांच्या लोकप्रियतेत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2020 हे वर्ष कोरोना महामारीमुळे गाजले आहे. कोरोना महामारी आणि त्यामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना काही महिने घरीच बसावे लागले. या काळात रोलिंग पेपर आणि कंडोमच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. डंजो अॅपद्वारे जारी करण्यात आलेल्या डिलिवरी ट्रेंड रिपोर्टमध्ये याबाबतची आकडेवारी देण्यात आली आहे.

रात्रीच्या तुलनेत दिवसा कंडोमची मागणी तीनपटींनी वाढल्याचे या आकडेवारीत म्हटले आहे. लॉकडाऊनच्या काळात कंडोमच्या मागणीत हैदराबादमध्ये सहापट, चेन्नईत पाचपट, जयपूरमध्ये चारपट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर मुंबई आणि बंगळुरूमध्ये तीनपट मागणी वाढल्याचे दिसून आले. तसेच रोलिंग पेपरच्या मागणीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रोलिंग पेपरचा वापर सिगरेट बनवण्यासाठी करण्यात येतो. बंगळुरूत चेन्नईच्या तुलनेत 22 पट रोलिंग पेपरच्या मागणीत वाढ झाली आहे.

बंगळुरू, पुणे, गुरुग्राम, हैदराबाद आणि दिल्लीमध्ये कुटुंबनियोजनाच्या औषधांचीही मागणी वाढली आहे. लॉकडाऊनच्या काळात या शहरात सर्वात जास्त आयपिल औषधांची मागणी होती. तर जयपूरमध्ये गर्भधारणा रोखण्यासाठी अॅपवरून औषधांची मागणी झाली आहे. कंडोमसह कुटुंबनियोजनासाठी औषधांचीही मागणी लॉकडाऊनच्या काळात वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

2020 या वर्षात लॉकडाऊनच्या काळात आणि त्यानंतर खाद्यपदार्थ मागवण्यासाठीही अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे दिसून आले. बंगळुरूमध्ये चिकन बिर्यानीला लोकप्रियता मिळाली. या वर्षात बंगळुरूत सर्वात जास्त चिकन बिर्यानीची मागणी नोंदवण्यात आली. तर मुंबईमध्ये दलाखिचडीची सर्वाधिक ऑर्डर देण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. चेन्नईत इडली तर गुरुग्राममध्ये आलू टिक्की आणि बर्गरला जास्त पसंती मिळाली.

पुणे आणि मुंबईत मॅगीची मागणी वाढल्याचेही दिसून आले. दिल्ली, चेन्नई आणि जयपूरमध्ये चहापेक्षा कॉफीची मागणी वाढली आहे. तर पुणे आणि हैदराबादमध्ये दूधाच्या मागणीतही वाढ झाली आहे. या काळात चहाकॉफीचा वापर आणि मागणी वाढल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. 2020 या वर्षात कोरोना महामारीमुळे अनेकांच्या जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. अनेकांनी खरेदीसाठी ऑनलाईनला प्राधान्य दिल्याचेही दिसून आले आहे.