
उदय जोशी, बीड
‘मराठा समाजाला आरक्षण द्या’ या मागणीसाठी ओबीसी नेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात सहभागी होत दिवसभर धरणे धरले. क्षीरसागर प्रथमच मराठा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्याने शिवसंग्रामचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी घणाघाती टीका केली. आरक्षणाला पाठिंबा दिल्यानंतर बीडमध्ये क्षीरसागर-शिवसंग्राममध्ये जुंपली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ते तातडीने द्या, या मागणीसाठी काल जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनात सहभागी होऊन ओबीसी नेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी दिवसभर धरणे धरले होते. या वेळी बोलताना क्षीरसागरांनी सरकारवर घणाघाती आरोप करत मराठा आरक्षणाबाबाबत सरकारची नियत साफ नाही, सरकारने आतापर्यंत काय दिवे लावले?, सरकारने काहीच केले नाही. आता आर्थिक निकषावर आरक्षणाची चर्चा हा नवीन बागुलबुवा असून विषयाला कलाटणी देणारा आहे. याला फार तर नवे गाजर किंवा नवे केळे म्हणा, असा टोला लगावला होता.
या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामने संताप व्यक्त करत मराठा आरक्षण प्रश्नावर जयदत्त क्षीरसागर यांची नौटंकी असल्याचे म्हटले. शिवसंग्रामचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या म्हणण्यानुसार, मराठा आरक्षण मुद्द्यावरून ३२ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. विधिमंडळात अनेकदा या मुद्द्यावरून वैचारिक रणकंदन सुरू असताना क्षीरसागर गप्प होते. प्रत्येक आंदोलनाकडे त्यांनी पाठच फिरवली. तिकडे मुंबईमध्ये मराठा आरक्षण मुद्द्यावर राष्ट्रवादीची बैठक होत असताना या बैठकीला दांडी मारून आरक्षणाचे कैवारी असल्याचे दाखवत बीडमध्ये धरणे आंदोलनाचा घाट घालत असल्याचा आरोप मस्के यांनी केला.



























































