सरकार–रिझर्व्ह बँकेतील तणाव वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भारतीय रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्यात सुरू असलेला तणाव आणखी वाढला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आता आरबीआयच्या थेट कामकाजावरच बोट ठेवले आहे. बँकांनी यूपीए सरकारच्या कार्यकाळात 2008 ते 2014 दरम्यान मनमानी करून कर्जवाटप केले. त्यामुळे एनपीए वाढला असून रिझर्व्ह बँकेने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप जेटली यांनी केला आहे. 2008च्या जागतिक मंदीनंतर तत्कालीन सरकारने बँकांना कर्जवाटपासाठी मोठय़ा प्रमाणावर सूट दिली होती. परिणामी एक वर्षात बँकांमधील क्रेडिट ग्रोथ 14 टक्क्यांहून 31 पर्यंत गेल्याचे जेटली यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, रिझर्व्ह बँकेला स्वायतत्ता देण्याची गरज असून सरकार केंद्रीय बँकेच्या स्वायत्ततेचा सन्मान करत नसेल तर सरकारचेच नुकसान असल्याचे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी नुकतेच म्हटले होते. सरकार टी-20 सामना खेळत असून आम्ही टेस्ट खेळत आहोत, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर आरोप केले होते. त्यानंतर आता अर्थमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेवर टीका केल्याने तणावाला आणखी खतपाणी घातले गेले आहे.

नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेला फायदा
आचार्य यांच्या वक्तव्यावर जेटली यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही; परंतु, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याचा दावा त्यांनी केला. सरकारच्या या निर्णयांमुळे महसुलात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली असून याआधीच्या सरकारने केवळ घोषणाच दिल्या होत्या असेही जेटली यांनी सांगितले. सरकार सत्तेवर आल्यानतंर करदात्यांची संख्या 3.8 कोटी होती. ही संख्या पुढच्या वर्षांपर्यंत 7.5 ते 7.6 कोटींपर्यंत पोहोचेल असा दावाही त्यांनी केला.

निवडणुका आल्यानंतर वचनांची आठवण होते!
सरकारने घेतलेले अनेक निर्णय घाईघाईत घेतलेले असतात. निवडणुका जवळ आल्या की सरकारला त्यांच्या वचनांची आठवण होते. ती पूर्ण करण्यासाठी मग सरकारची धावपळ सुरू होते. जेव्हा वचने पूर्ण होऊ शकत नाहीत, असे लक्षात येते तेव्हा पर्याय शोधले जातात; पण आरबीआय घाईघाईत निर्णय घेत नाही. दीर्घकाळ फायद्याचे ठरतील असेच निर्णय आरबीआय घेते, असे मत विरल आचार्य यांनी व्यक्त केले.