
14 एप्रिल रोजी ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त पहिली ते बारावीचे विद्यार्थी, अध्यापक महाविद्यालये तसेच शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या, मात्र या सूचनांमुळे शाळांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 14 एप्रिलला आंबेडकर जयंतीची सुट्टी असल्याने शाळा बंद आहेत, तर काही शाळांमध्ये वार्षिक परीक्षा संपल्याने उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन कसे करणार, असा प्रश्न आता मुख्याध्यापकांसमोर उपस्थित झाला आहे.
आंबेडकर जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, एकपात्री अभिनय, चित्रकर्ला, निबंध, कविता, काव्यवाचन, पोस्टरनिर्मिती आणि रांगोळी स्पर्धा, व्हिडीओ निर्मिती, दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह, एकांकिका, कथाकथन स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर कार्यक्रमाच्या सादरीकरणाचा व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाज संपर्क माध्यमावर (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम) #muknayak Ùee HASHTAG (#) चा वापर करून अपलोड करण्याच्या तसेच सदर पोस्टची लिंक https://scertmaha.ac.in/competitions/ येथे शेअर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, मात्र या दिवशी शाळांना सुट्टी असल्याने हे कार्यक्रम ऑनलाइन घ्यायचे की विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून घ्यायचे याविषयी शालेय शिक्षण विभागाकडून कोणत्याही सूचना शाळांना मिळालेल्या नाहीत.

























































