
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अंबड शहरात 8 ते 10 काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले कार्यकर्ते रावसाहेब दानवे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याच्या तयारीत होते. या सर्व काँगेस कार्यकर्त्यांना एका हॉटेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भाजपची जनआशीर्वाद यात्रा जालन्यातील बदनापूरमध्ये आली असताना तिथे झालेल्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत राहुल गांधी यांच्यावर हीन दर्जाची टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. दानवेंच्या या वक्तव्याच्या विरोधात दानवे यांचा पुतळा जाळून व त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन निषेधही करण्यात आला होता. तसेच काँग्रेसच्या वतीने दानवे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. त्या इशाराच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अंबड शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांमध्ये केदार कुलकर्णी, विठ्ठलसिंग राजपूत, संभाजी गुढे, नारायण शंकरराव गुढे, सलमान गफार शेख, वैजिनाथ ज्ञानदेव डोंगरे, शेख जाकेर मकबुल शेख, मुस्ताक शहा इब्राहिम शहा यांचा समावेश आहे.




























































