गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात लातूरमध्ये महिला काँग्रेसचे धरणे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांचे हाल होत असून जीवनावश्यक वस्तू गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. नुसत्या पोकळ घोषणा देत वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. केंद्रातील सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ लातूर महिला जिल्हा काँग्रेसच्या वतीने लातूरमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.

महात्मा गांधी चौकात शुक्रवारी ‘मोदी सरकार चले जाओ’ च्या घोषणा देत चुलीवर भाकरी करून आंदोलन व निर्दशने करण्यात आली. लातूर महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सुनीता आरळीकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गॅस सिलिंडर,पोळपाट, लाटणे, भाजीपाला, चूल आणून भाकरी बनवत मोदी सरकारचा निषेध केला.

यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा आरळीकर म्हणाल्या की, मोदी सरकारने केलेल्या भरमसाठ गॅस सिलंडर, इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी. मोदी सरकारने जागे व्हावे. यापुढे गोरगरीब महिला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून सरकारला जाग आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. यावेळी धरणे आंदोलनात निलंग्याच्या माजी नगराध्यक्षा सुनीताताई चोपने, सुरेखा गायकवाड आदींसह काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.