अदानी समूहात LIC ची 33,000 हजार कोटींची गुंतवणूक? ग्राहकांच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा गैरवापर; काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

एलआयसीवर (LIC) अदानी समूहात 33,000 कोटी गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्टचा हवाला देत, काँग्रेस पक्षाने म्हटले आहे की, एलआयसीने मे 2025 मध्ये अदानी समूहाला फायदा व्हावा यासाठी ही गुंतवणूक केली. ग्राहकांच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा गैरवापर झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस पक्षाने संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीकडून (PAC) याप्रकरणी चौकशीची मागणी करत मोदी सरकारवर टीका केली आहे.

X वर एक पोस्ट करत याप्रकरणी बोलताना काँग्रेसचे नेते जयराम रमेश म्हणाले की, “मोदानी संयुक्त उपक्रमाने एलआयसी आणि त्यांच्या 30 कोटी पॉलिसीधारकांच्या बचतीचा कसा गैरवापर केला याबद्दल काही धक्कादायक खुलासे अलीकडेच माध्यमांमध्ये समोर आले आहेत. कागदपत्रांवरून असे दिसून येते की, हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनी मे 2025 मध्ये एक प्रस्ताव तयार केला होता, ज्या अंतर्गत एलआयसीच्या निधीपैकी अंदाजे 33,000 कोटी रुपये अदानी समूहाच्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आले होते.

ते म्हणाले, “या महाघोटाळ्यांची चौकशी फक्त संसदेच्या संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) द्वारेच केली जाऊ शकते. पहिले पाऊल म्हणून संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीने (पीएसी) एलआयसीला अदानी समूहात गुंतवणूक करण्यास कसे भाग पाडले गेले याची चौकशी करावी.”