
देशात वाढलेली मंदी, घसरलेला जीडीपी, बलात्कार आणि हत्यांमुळे पसरत असलेला असंतोष या मुद्द्यांवर काँग्रेसने दिल्लीतील रामलीला मैदानावर भारत बचाव आंदोलनाचं आयोजन केलं आहे. या रॅलीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी तसेच काँग्रेसमधील अन्य नेते सहभागी झाले आहेत. या रॅलीतून प्रियंका गांधी यांनी विविध मुद्द्यांवर मोदी सरकारला घेरले आहे.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, हा देश एक आंदोलन बनत चालला आहे. भाजपच्या सहा वर्षांच्या सरकारमध्ये जीडीपी प्रचंड घसरला आहे. छोटे व्यापारी नाखूश आहेत. भाजपमुळे चार कोटी रोजगार नष्ट झाले आहेत. तरीही प्रत्येक बस स्टॉपवर मोदी है तो मुमकीन है, अशा जाहिराती दिसत आहेत. भाजप आहे, तर 100 रुपये किलो कांदा शक्य आहे, 4 कोटी रोजगार नष्ट होणं शक्य आहे, 15 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्याही शक्य आहेत. भाजप आहे तर जो कायदा देशाच्या विरोधात आहे, तोही शक्य आहे, अशा शब्दांत प्रियंका यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
देशातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांवरही प्रियंका यांनी मोदी सरकारवर टीका केली. हे सगळं थांबवण्यासाठी आज आपण आवाज उठवणं गरजेचं आहे. जर आपण आज याविरुद्ध काहीही बोललो नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली राज्यघटना नष्ट होईल, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

























































