काँग्रेस भवनमध्ये दोन गटांत हाणामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापुरात काँग्रेस भवनमध्ये आमदार प्रणीती शिंदे समर्थकांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. सोलापूर काँग्रेस भवनमध्ये रविवारी सकाळी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आमदार प्रणीती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित हाते.

कार्यक्रमादरम्यान स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सुशील बंदपट्टे व सुभाष वाघमारे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. आमदार प्रणीती शिंदे कार्यक्रमानंतर बाहेर गेल्या. दरम्यान, पुन्हा बंदपट्टे व वाघमारे गटात वादविवाद वाढत जाऊन हाणामारीला सुरुवात झाली. काँग्रेस भवनमधून एकमेकांना ओढत व मारहाण करत दोन्ही गट बाहेर आल्याने वातावरण आणखीन चिघळले. यावेळी चेतन नरोटे, अंबादास करगुळेसह अन्य पदाधिकाऱयांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना बाजूला सारले.