
नागपूर विधान परिषद निवडणूकीत काँग्रेसने ऐनवेळी आपला अधिकृत उमेदवार डॉ. छोटू भोयर यांना बदलवून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेस उमेदवार म्हणून पाठिंबा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे, भाजपचे उमेदवार चंद्रकांत बावनकुळे व मंगेश देशमुख यांच्यात लढत होणार आहे.
निवडणूक घोषित झाल्यानंतर काँग्रेसने घोषित केलेले भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर हे निवडणूक लढण्यास अनुत्सुक असल्याचे कारण पुढे करीत त्यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना आपला उमेदवार घोषित केले आहे. तसे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांना पाठवण्यात आले आहे. हे पत्र नागपुरात धडकताच काँग्रेसवर उमेदवार बदलण्याची नामुष्की आल्याची चर्चा सुरू झाली.
नागपूर स्थानिक स्कराज्य संस्थेच्या निकडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पक्षातर्फे डॉ. रवींद्र भोयर यांना उमेदवारी जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी उद्या दिनांक 10 डिसेंबर 2021 रोजी मतदान होत आहे. मात्र आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात डॉ. रवींद्र भोयर यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी आपण असमर्थता दर्शविल्याचे समजते. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मान्यतेने तसेच प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख यांना पक्षातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. या निवडणुकीतील मतदान करणाऱया काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांना तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना यासंदर्भात माहिती देण्यात आली असल्याची चर्चा आहे.


































































