
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलनुसार गोव्यामध्ये (Goa Assembly Elections) त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल, अशी शक्यता आहे. एक्झिट पोलमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एक्झिट पोलचा अंदाज जाहीर होताच काँग्रेसने (Congress) सत्तेसाठी घुमजाव करत निकालोत्तर भाजपविरोधी (BJP) पक्षांसोबत आघाडी करण्याचे सूतोवाच केले आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्ष (AAP) आणि तृणमूल काँग्रेसशी (TMC) हातमिळवणी करण्यासाठीही काँग्रेस तयार आहे. याआधी काँग्रेसने या दोन्ही पक्षांवर भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला होता.
काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao ) यांनी भाजप विरोधकांशी हातमिळवणीस काँग्रेस तयार असल्याचे म्हटले आहे. ‘जे पक्ष भाजपविरोधी आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि एकत्र येऊ. मी सध्या कोणत्याही एका खास पक्षाबाबत बोलत नाहीय. भाजपला समर्थन देऊ इच्छित नाही अशा कोणत्याही पक्षाशी आम्ही हातमिळवणी करू’, असे दिनेश गुंडू राव म्हणाले.
विधानसभा निवडणुकीवेळी आमच्याविरोधात आम आदमी पक्ष आणि टीएमसीकडून जे आरोप लगावले गेले ते निवडणुकीपुरते होते. परंतु आता निकालानंतर पुढे काय हे सर्वस्वी या पक्षांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. आमच्यापुरते बोलायचे झाल्यास आम्ही भाजपचे समर्थन न करणाऱ्या पक्षांसोबत काम करण्यासाठी तयार आहोत. तसेच आप आणि टीएमसी भाजपविरोधी आहेत हे आम्हाला ठावूक आहे, परंतु आता निकालानंतर पुढे काय? ही भूमिका त्यांना घ्यायची आहे, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष (MGP) काँग्रेसच्या संपर्कात आहेत. एमजीपीने टीएमसीशी आघाडी करून निवडणूक लढवली होती. त्यामुळे यावेळी 2017 सारखी परिस्थिती उद्भवणार नाही. आम्ही सोबत असून काँग्रेस सरकार बनवण्यासाठी तयार आहे, असेही ते म्हणाले. तसेच निकाल लागताच आम्ही सरकार स्थापन करण्याचा दावा करू आणि संविधानानुसार राज्यपालांना ते मान्य करावे लागेल. मला यावेळी काही चुकीचे होणार नाही हे स्पष्ट दिसतेय, असेही दिनेश गुंडू राव म्हणाले.
Assembly Election 2022- उत्तर प्रदेशात भाजप; गोवा, उत्तराखंडमध्ये त्रिशंकू; पंजाबमध्ये ‘आप’
गेल्यावेळी 40 विधानसभा जागा असणाऱ्या गोव्यात काँग्रेसने 17 जागा जिंकल्या होत्या. तरीही काँग्रेस सरकार स्थापन करू शकले नाही. उलट 13 जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्ष उमेदवारांना हाताशी घेत सरकार बनवले आणि पाच वर्ष टिकवलेही. मध्यंतरी 2017 ते 2019 या काळात काँग्रेसचे तीन आमदार ‘हात’ सोडून भाजपमध्ये सहभागी झाले होते. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर मार्च 2019 मध्ये पणजीमध्ये झालेली पोटनिवडणूक काँग्रेसने जिंकली होती. परंतु काही महिन्यातच काँग्रेसला धक्का बसला होता आणि 15 आमदार भाजपमध्ये गेले. त्यामुळे काँग्रेसकडे फक्त एक आमदार उरला होता. त्यामुळे काँग्रेसने आता आधीपासूनच सावध भूमिका घेतली आहे.
गोव्याचा एक्झिट पोल
एकूण जागाः 40 बहुमतासाठीः 21
चॅनेल भाजप काँग्रेस तृणमूल इतर
एबीपी 13-17 12-16 5-9 0-2
इंडिया टुडे 14-18 15-20 – 0-4
टीव्ही-9 17-19 11-13 – 2-7



























































