
कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण हिंदुस्थानात सापडला तेव्हापासुनच आम्ही सरकारला योग्य दक्षता घेण्याची सुचना केली होती. गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने योग्य खबरदारी घेण्याची मागणी केली होती. परंतु मुख्यमंत्र्यानी जिल्हा पंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार करण्याच्या नादात लोकांच्या आरोग्याकडे पुर्ण दुर्लक्ष केले, अशी टीका गोव्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली तसेच आज कोरोना व्हायरसचे महाभंयकर संकट समोर असताना, लोकांच्या आरोग्याची जबाबदारी सरकार घेणार नाही असे विधान करुन डॉ. प्रमोद सावंत यानी तमाम गोमंतकीयांचा घोर अपमान केला आहे त्यांनी राजीनामा द्यावा असेही चोडणकर म्हणाले.
जनतेचे हित जपण्यास असमर्थ ठरलेल्या डॉ. प्रमोद सावंताना एक दिवसही मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नसुन, त्यानी ताबडतोब राजीनामा देणे हेच जनतेच्या हिताचे आहे, अशी मागणी करत चोडणकर म्हणाले, त्यानी राजीनामा न दिल्यास राज्यपालांनी त्याना बडतर्फ करुन सुत्रे आपल्या हातात घ्यावी असेही चोडणकर म्हणाले.
चोडणकर म्हणाले, “जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने उघडी ठेवावी असे स्पष्ट निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेले असताना, त्याविरूद्ध निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याना कोणी दिला हे प्रमोद सावंतानी सांगावे. मुख्यमंत्री हे पंतप्रधानांपेक्षा मोठे असू शकत नाहीत हे प्रमोद सावंत यानी ध्यानात ठेवावे व प्रधानमंत्र्यांचे भाषण परत नीट ऐकावे.”
मुख्यमंत्र्याना गोमंतकीयाच्या हिताचे अजिबात पडलेले नाही हे मागील 85 दिवस गोव्यात साधी टेस्टींग सुविधा सुरू करण्यास त्याना आलेल्या अपयशावरुन स्पष्ट होते, असे सांगून चोडणकर म्हणाले, मागील 85 दिवस आम्ही सरकारला दररोज याची आठवण करुन देतो पण केवळ अहंकारामुळे त्यांनी आमच्या मागणी कडे दुर्लक्ष केले आहे. गोमेकॉपासुन दूर कोरोंटायन सेंटर सुरू करण्याच्या आमच्या मागणीसही त्यानी एवढे दिवस काहीच प्रतिसाद दिला नाही व आता तीन रुग्णसापडल्यानंतर धावाधाव चालु आहे.
गोव्यातील डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचारी तसेच पोलीस यांना कोरोनाच्या संसर्गापासुन बचाव करण्यासाठी साधे मास्क देणेही सरकारला जमले नसुन, लोकांच्या आरोग्याकडे सरकारने खेळ मांडला आहे,असा आरोप चोडणकर यांनी केला आहे.
आपल्या नाकर्तेपणाचे खापर जनतेच्या माथी फोडणाऱ्या व लोकांना विघ्नसंतोषी म्हणणाऱ्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी ताबडतोब पायउतार व्हावे, अशी मागणी करत चोडणकर म्हणाले, सरकारने हात वर केल्याने लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी स्वतः घेणे आता महत्वाचे ठरले आहे. जनतेने पुर्ण संयम राखावा व गर्दी टाळुन एकामेकांपासुन योग्य अंतर ठेवावे. अगदी तातडीची गरज भासल्यासच घराबाहेर पडावे,असे आवाहन चोडणकर यांनी केले आहे.























































