मुंबईतील रस्ते घोटाळ्यांची ईडी चौकशी करा; काँग्रेसचा आंदोलन, कोर्टात जाण्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात पालिका प्रशासनाने 398 रस्ते सिमेंट-काँक्रीटचे करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी 6 हजार कोटी खर्च करण्यात आला. मात्र यातील 20-25 टक्केही काम झालेले नसताना दुसऱया टप्प्यात 447 रस्ते सिमेंट-काँक्रीटचे करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे दुसऱया टप्प्यातील निविदेमध्ये पहिल्या टप्प्यातील अनेक रस्ते पुन्हा घेण्यात आले आहेत. दहिसरमध्ये राजाराम माने मार्गाचे काम अजून चालू आहे. तसेच म्हात्रे वाडीतील 10 रस्तेही पुन्हा दुसऱया वेळी काढण्यात आलेल्या निविदांमध्ये घेण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ते कामात झालेल्या घोटाळय़ाची सखोल ईडी चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा जोरदार आंदोलन आणि न्यायालयीन लढय़ाचा इशारा मुंबई काँग्रेसने दिला.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन रस्ते कामात घोटाळा झाल्याचा आरोप केला. रस्ते कामात झालेल्या घोटाळय़ाचे पुरावेच त्यांनी यावेळी सादर केले. 1997 ते 2021 पर्यंत 21 किलोमीटर रस्त्यांची कामे मुंबईत करण्यात आली मग या एका वर्षात 6 हजार कोटींची कामे काढण्यास इतकी घाई कशाला करण्यात आली, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. काँग्रेसच्या दहिसरमधील माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी या रस्ते कामात घोटाळा झाल्याची माहिती उघड केली आहे. यावेळी माजी नगरसेवक आसिफ झकेरिया, युवराज मोहिते, आदी उपस्थित होते.