
काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय आणि राज्य नेतृत्वात मतभेद झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या यादीला मुहूर्त सापडेनासा झाला आहे. 20 सप्टेंबर रोजी यादी जाहीर करण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली होती. परंतु ती अद्याप जाहीर केली गेलेली नाही. हे मतभेद आणि इतर कारणांमुळे निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय नेतृत्व येण्याची शक्यता कमी झाल्याने महाराष्ट्रातील निवडणूक काँग्रससाठी ‘निर्नायकी’ ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
काँग्रेसच्या केंद्रीय आणि राज्य नेतृत्वात अनेक मुद्द्यांवरून मतभेद निर्माण झाले आहेत. लोकसभेतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर ते जवळजवळ प्रभावहीनच झाले आहेत. तरीसुद्धा लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून ते सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. दुसरीकडे मोदींवर अशी सातत्याने टीका करणे योग्य नसल्याचे मत काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांना प्रचारात उतरवणे हेसुद्धा पक्षासाठी धोकादायक ठरू शकते, असेही अनेकांचे मत आहे.
राहुल गांधींना प्रचारासाठी बोलवण्यात असलेला धोका आणि तब्येतीच्या कारणास्तव सोनिया गांधी या प्रचारासाठी येतील याबद्दल नसलेली शाश्वती यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीत काँग्रेसकडे चेहराच नसल्यासारखी स्थिती आहे. उमेदवार कोणते द्यावेत यावरूनही केंद्रीय व राज्य नेतृत्वात एकमत होत नसल्याने प्रदेशाध्यक्ष थोरात यांना यादी बनवणे कठीण होऊन बसले असल्याची चर्चा आहे.



























































