
कॉंग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत म्हटले की, ज्यांची विचारसरणी स्वातंत्र्यलढ्यात आणि संविधान निर्मितीत कुठेही भूमिका नव्हती, ती विचारसरणी आता आपला राजकीय फायदा साधण्यासाठी महान व्यक्तींच्या वारशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले, “आज जेव्हा देश सरदार पटेल यांची 150 वी जयंती साजरी करत आहे, तेव्हा आपल्याला हेही लक्षात ठेवले पाहिजे की 13 फेब्रुवारी 1949 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गोध्रा येथे सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. गोध्रा येथूनच भारताचे ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखले जाणारे पटेल यांनी आपल्या वकिली कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्या प्रसंगी पंडित नेहरू यांनी दिलेले भाषण पुन्हा पुन्हा वाचले पाहिजे, कारण त्यातून दोन्ही नेत्यांमधील तीन दशकांहून अधिक काळ चाललेली घट्ट आणि दृढ सहप्रवासाची झलक मिळते.
रमेश म्हणाले, “19 सप्टेंबर 1963 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी नवी दिल्लीतील संसद भवन आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळील एका प्रमुख चौकात सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्या वेळी पंडित नेहरूही उपस्थित होते आणि त्या पुतळ्यावर कोरल्या जाणाऱ्या शिलालेखासाठी ‘भारताच्या एकतेचे शिल्पकार’ हे साधे पण अत्यंत प्रभावी शब्द त्यांनी स्वतः निवडले होते.”
रमेश यांनी सरदार पटेल यांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना लिहिलेल्या एका पत्राची प्रत शेअर करत म्हटले, “2014 नंतर इतिहासाला विशेषतः ‘जी 2’ आणि त्यांच्या यंत्रणेने उघडपणे तोडले, मुरडले आणि विकृत केले आहे. निःस्वार्थपणे राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या या महान व्यक्तींच्या वारशाचा वापर त्या विचारसरणीने स्वतःच्या राजकीय हितासाठी करणे निश्चितच सरदार पटेल यांना वेदनादायक ठरले असते.”
रमेश म्हणाले की, “ही अशी विचारसरणी आहे, ज्याचा ना स्वातंत्र्यलढ्यात काही वाटा होता, ना संविधान निर्मितीत. आणि जी, स्वतः सरदार पटेल यांच्या शब्दांत सांगायचे तर, याच विचारसरणीमुळे महात्मा गांधींची हत्या झाली असेही जयराम रमेश म्हणाले.
 
             
		





































 
     
    




















