गलिगात्र अवस्थेतही काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद, संजय निरुपमांची मिलिंद देवरांवर अप्रत्यक्ष टीका

59

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तीन महिन्याचा कालावधी उरला असताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर लगेच काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. देवरा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी देवरा यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले आहे. हा राजीनामा आहे की, वर जाण्याची शिडी असा टोला निरुपम यांनी लावला आहे.

मिलिंद देवरा यांनी मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर निरुपम म्हणाले की, “राजीनाम्यात त्यागाची भावना असते. इथे तर दुसर्‍याच क्षणी राष्ट्रीय स्तरावरचे पद मागितले जात आहे. हा राजीनामा आहे की वर जाण्याची शिडी” पक्षाने अशा कर्मठ लोकांपासून सावध राहिले पाहिजे असा इशाराही त्यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई काँग्रेसची जबाबदारी निरुपम यांच्याकडून काढून मिलिंद देवरा यांच्याकडे सोपवण्यात आले होते. तेव्हापासून निरुपम यांच्यामनात खदखद आहे. आता ट्विटरवरून त्यांनी ती अप्रत्यक्षरित्या व्यक्त केली आहे. तसेच मुंबई काँग्रेस चालवण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमणे ही बाब चुकीची ठरेल त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल असेही त्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या