नरेंद्र मोदी यांच्या काळात देश मृतावस्थेत, सुशीलकुमार शिंदे यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था ढासळत आहे. सामाजिक शांतता नाही. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. सध्या देशात जे काही सुरू आहे, त्यावरून देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली आहे. त्यामुळे देशात बेबंदशाही निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दिला आहे.

सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी दिवंगत सुधाकरपंत परिचारक, भागवताचार्य वा. ना. उत्पात, ह.भ.प. रामदास महाराज जाधव, राजूबापू पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, देशात हाथरससारखी अनेक प्रकरणे घडली आहेत. येथे सामाजिक विचार खाली गेलेला आहे. गरीब माणसाला येथे राहणे मुश्किल झालेले आहे. आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. तरुणांना वाव राहिलेला नाही. त्यामुळे देशातील विस्कटलेल्या सर्व विरोधी पक्षांनी देशहितासाठी एकत्र येण्याची गरज आहे. सध्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या प्रश्नावर काही मंडळी भडक विधाने करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.