आता नितीन गडकरी साहेबांची कोणती चीप आणि डिस्क खराब झाली आहे ? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा फडणवीसांना सवाल

निवडणूक आयोगाने मतांची चोरी केली असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. त्याचे पुरावेही राहुल गांधी यांनी दिले होते. त्यावर राहुल गांधी यांची डोक्यातली चीप खराब झाल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनीही आपल्या मतदारसंघातून लाखो मतदारांची नावं हटवली गेल्याचे म्हटले आहे. यावरू काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गडकरी साहेबांची कोणती चीप आणि डिस्क खराब झाली आहे असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे.

नितीन गडकरी यांनी इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटले होते की माझ्या मतदारसंघात साडे तीन लाख मतदारांची नावं हटवण्यात आली होती. तसेच आपल्या काही नातेवाईकांचीही नावं हटवण्यात आल्याचे गडकरींनी म्हटले होते. वडेट्टीवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांची कोणती चीप आणि डिस्क खराब झाली आहे ? निवडणुक आयोगाची वकिली करणारे मुख्यमंत्री, भाजप नेते गडकरींना जाब विचारणार का ? मतचोरी होते, मतदारयादीत घोळ केले जातात याचा पुरावा आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

तसेच केंद्रीय मंत्री गडकरी यांनी गंभीर आरोप केला की त्यांच्या निवडणुकीत मतदारसंघातील साडे तीन लाख नावं वगळण्यात आली. विशेष म्हणजे जी नावं वगळण्यात आली ते त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक होते. त्यांच्या भाच्याचे नावही वगळण्यात आले, अस गडकरी म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळच्या लोकांची मत जर मतदारयादीतून गायब होत असतील तर इतरांचे काय ? कुठे मतदार वाढवून दाखवले जात आहे तर कुठे मतदार गायब केले जात आहे, मतचोरीचा याहून मोठा पुरावा काय आहे ?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवडणूक आयोग आता प्रतिज्ञापत्रक मागणार का ? अजून पुरावे मागणार की माफी मागणार ? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.