
मार्च महिन्यापासून डिसेंबर 2020 पर्यंतच्या कर्जांच्या हप्त्यांवरील व्याज माफ करावे अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसने रिझर्व्ह बँकेकडे केली आहे. कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊनमध्ये लोक घरामध्येच अडकून पडले. त्यामुळे अनेकांना नोकऱया गमवाव्या लागल्या असून बहुतांश नागरिकांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे असे काँग्रेसच्या वतीने रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष अमरजीतसिंग मनहास यांनी हे पत्र गव्हर्नरना दिले आहे. लॉकडाऊनच्या काळातील कर्जाच्या हप्त्यांवर व्याज घेतले गेले तर नागरिकांवर आणखी आर्थिक बोझा वाढेल असे त्यात म्हटले आहे. मुंबईतील अनेक नागरिकांनी घर, व्यवसाय, वाहन, शिक्षण आदींसाठी कर्जे घेतली आहेत. उत्पन्न कमी असलेले नागरिक आर्थिक चणचणीमुळे आपला मासिक खर्च भागवण्यासाठी क्रेडिट कार्डांचा वापर करत आहेत. व्याजमाफीमुळे त्यांना दिलासा मिळेल असे या निवेदनात म्हटले आहे. बँक खात्यात किमान रकमेची अटही रद्द करावी असेही त्यात म्हटले आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना कर्जाचे हप्ते भरण्याची मुदत ऑगस्टपर्यंत वाढवण्यास बँकांना परवानगी दिली आहे.






















































