वंचित बहुजन आघाडीमुळे महाआघाडीचा तोटा; दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या पराभवात हातभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यात काँग्रेसचे पतन होण्यात वंचित बहुजन आघाडीचा मोठा काटा असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी वंचित  आघाडीच्या उमेदवारांमुळे झालेल्या मतविभाजनाचा फटका आघाडीच्या विशेषतः काँग्रेसच्या उमेदकारांना बसला. सोलापुरात सुशीलकुमार शिंदे, नांदेडमध्ये अशोक चव्हाण हे दोन माजी मुख्यमंत्री, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासह सात जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पराभवास वंचित आघाडीने हातभार लावला.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत समाधानकारक जागा मिळत नसल्याने भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्वच्या सर्व 48 जागा लढवण्याचा निर्णय घेतला. निवडणूक लढवायची म्हणून न लढता एकास एक उमेदवार देत प्रत्येक मतदारसंघात डॉक्टर, वकील, उद्योजक यासारखे एक सक्षम पर्याय उमेदवार म्हणून उभे केले. यामुळे आजवर ज्यांच्या भरवशावर काँग्रेस-राष्ट्रवादीने जातीय बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला ती व्होट बँक वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभी राहिल्याने जवळपास सात जागांचा तोटा महाआघाडीला झाल्याचे निवडणूक निकालावरून दिसून येत आहे.

सोलापूर, नांदेड, परभणी, बुलढाणा, गडचिरोली-चिमूर या काँग्रेस-राष्ट्रवादीने लढविलेल्या तर हातकणंगले आणि सांगलीत स्वाभिमानी शेतकरी पक्षाला पराभक पत्कराका लागला आहे. या आठही जागांवर वंचित आघाडीच्या उमेदवारांनी एक लाखापेक्षाही अधिक मते घेतल्याचा फटका महाआघाडीच्या उमेदवारांना बसला. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, गोपीचंद पडळकर विजयी झाले नाहीत, पण त्यांनी घेतलेल्या मतांच्या आघाडीमुळे आघाडीच्या उमेदवारांचे मताधिक्य कमी झाल्याचे दिसून येत आहे.

मुंबई-ठाण्यात फारसा प्रभाव नाही

ग्रामीण भागातील मतदारांनी वंचित आघाडीला बर्‍यापैकी साथ दिली. मुंबई-ठाण्यात मात्र फारसा प्रभाव दिसून आला नाही. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी 25 हजार ते तीन लाखांपर्यंत मते काही मतदारसंघांत घेतली. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी दुसर्‍या तर सोलापुरात तिसर्‍या क्रमांकाची मते घेतली. औरंगाबाद (संभाजीनगर)मध्ये वंचितचे उमेदवार इम्तियाज जलील निवडूनही आले आहेत.

या मतदारसंघांत  लाखाची कमाई

औरंगाबाद (संभाजीनगर), बीड, हातकणंगले,  हिंगोली, लातूर, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद (धाराशीव), परभणी, रावेर, सांगली, सोलापूर, यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली-चिमूर या मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना लाखाच्या घरात मते मिळाली.