काँग्रेस अध्यक्ष निवडीचा श्रावणात योग जुळणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

भरकटलेल्या जहाजासारखी स्थिती झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीला श्रावण महिन्यात मुहूर्त सापडेल, अशी शक्यता पक्षातील सूत्रांनी वर्तवली आहे. संसदेचे अधिवेशन संपताच काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक होईल, त्यात पक्षाध्यक्ष निवडीचा गुंता सुटेल, असे बोलले जात आहे.

राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस गेले काही महिने नेतृत्वाविना आहे. एकीकडे अध्यक्षनिवडीची बोंब, तर दुसरीकडे पक्षातून नेते-कार्यकर्ते गळू लागले आहेत. पक्षाचे भरकटलेले जहाज वाचवण्यासाठी अध्यक्षनिवडीसाठी आता श्रावणातील योग शोधला जात आहे. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर कार्यकारी समितीची बैठक बोलावली जाईल, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सांगितले.  

सोनिया, राहुल गांधी बैठकीला हजर राहणार

कार्यकारी समितीच्या बैठकीला वरिष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदासाठी नव्या चेहरा निश्चित केला जाणार आहे.