सोलापुरात काँग्रेसच्या दोन आमदारांची उमेदवारीच्या मुलाखतींना दांडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सोलापूर

विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आली असतानाच काँग्रेसमध्येही तशीच परिस्थिती असल्याचे दिसत आहे. सोलापूरमध्ये काँग्रेसच्या दोन विद्यामान आमदारांनी इच्छुकांच्या मुलाखतीला दांडी मारली आहे. पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे हे दोघेही या मुलाखतीला अनुपस्थितीत होते. आमदार शरद रणपिसे यांच्या उपस्थितीत सोलापुरात विधानसभेसाठी इच्छुकांची मुलाखती सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून आमदार भारत भालके आणि सिद्धाराम म्हेत्रे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच त्यांनी मुलाखतीकडे पाठ फिरवल्याने या चर्चांना उधाण आले आहे.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखती अजित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. त्यावेळीही बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे हे दोघे मुलाखतींना अनुपस्थित होते. आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेच्या तर बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सोलापुरातील हे चार आमदार मुलाखतींना अनुपस्थित राहिल्याने जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. तसेच या भागातील उमेदवारी कोणाला द्यायची असा प्रश्न या पक्षांसमोर उभा ठाकला आहे.

आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी परगावी असल्याने मुलाखतील उपस्थित राहता आले नाही, असे कारण दिले आहे. तर भारत भालके हे आऊट ऑफ कव्हरेज असल्याचे सांगण्यात आले. आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेसमधीलच अंतर्गत वादाला सामोरे जावे लागत आहे. शिंदे यांच्या सोलापूर मध्य मतदारसंघात काँग्रेसची व्होट बँक समजल्या जाणार्‍या मुस्लिम आणि मोची या दोन्ही समाजाने उमेदवारीवर हक्क सांगितला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळमधून राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी या दोन्ही समाजाची मागणी आहे. मात्र, मोहोळमध्ये निवडणूक न लढवता आपण मध्य सोलापूर मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याचे प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखतीसाठी विद्यमान आमदारांपैकी फक्त आमदार प्रणिती शिंदे याच उपस्थित होत्या, तर चार आमदारांनी मुलाखतीला दांडी मारली आहे. त्यामुळे राजकीय वतुर्ळात तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत.