
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माझा देश हेच माझे कुटुंब आहे…या वक्तव्यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले आमचे प्राधान्य देशातील जनता आहे आणि आम्ही महागाई, बेरोजगारी, आर्थिक अस्थिरता आणि केंद्रीकरण याच्याविरोधात आवाज उठवत आहोत. 140 कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुटुंब असेल, तर मोदी यांनी जनतेवर अन्याय करत त्यांचा विश्वासघात का केला असा सवाल करत रमेश यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
जयराम रमेश म्हणाले, मागच्या 10 वर्षात पंतप्रधान मोदी यांनी आपल्या कुटुंबासोबत म्हणजेच देशातील नागरिकांसोबत अन्याय केला आहे. ते लोकशाही पद्धतीने निवडून आलेले व्यक्ती पण त्यांचे व्यक्तिमत्व आणि काम करण्याची पद्धत हुकूमशाहीची आहे. ते फक्त भाजप आणि एनडीए सरकारची मार्केटिंग आणि ब्रॅण्डींग करतात. त्यांनी स्वत:ला विश्वगुरु घोषित केले आहे. मात्र ज्याला आदर हवा त्याने आधी इतरांचाही आदर करायला हवा, असा टोलाही जयराम रमेश यांनी लगावला आहे.
तेलंगणातील सभेत सोमवारी मोदींनी देश हेच माझे कुटुंब आहे, देशातला प्रत्येक गरीब आणि अनाथांचा मोदी आहे, असे म्हणाले. त्यानंतर सोशल मीडियात आपल्या नावापुढे ‘मोदी का परिवार’ लिहिण्याची भाजप नेत्यांत चढाओढच लागली. त्यावरून विरोधकांनी मोदी आणि भाजपची धुलाई केली आहे. राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी बिहारची राजधानी पाटणा येथे ‘इंडिया’च्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींवर घराणेशाही आणि परिवारवादाचा आरोप केला होता. त्यानंतर मोदी परिवाराबाबत चर्चा सुरू आहेत. देशातील 140 कोटी जनता मोदी यांचा परिवार नाही का, असा सवाल करत विरोधक यावर टीका करत आहेत.





























































