काँग्रेस करणार पाच राज्यांतील पराभवाचे चिंतन, दिल्लीत आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत झालेल्या दारुण पराभवामुळे काँग्रेसच्या गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. सत्ता असलेले पंजाबसारखे राज्य हातातून गेल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या पराभवांची मीमांसा आणि आत्मचिंतन करण्यासाठी कॉँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची रविवार, 13 मार्च रोजी दिल्ली येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या निवडणुकीत काँग्रेसला चांगलाच धक्का बसला असून पाचही राज्यांत काँग्रेस भुईसपाट झाली आहे. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन दिल्लीत करण्यात आले आहे. या बैठकीला कार्यकारिणीतील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असून यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसच्या पराभव आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवरदेखील सांगोपांग चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

‘आप’ फॅक्टर रोखण्याचे आव्हान

कॉँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये ‘आप’ने जोरदार मुसंडी मारली. गोव्यातही दोन जागा मिळवल्या. पंजाबमध्ये 2017 च्या निवडणुकीमध्ये 77 जागा मिळविणारा काँग्रेस पक्ष थेट 18 जागांपर्यंत खाली आला. आत्तापर्यंत एका राज्यापुरता मर्यादित असलेल्या ‘आप’सारख्या नव्या पक्षाने पंजाबमध्ये जोरदार मुसंडी मारली. देशातील इतर राज्यांत आप फॅक्टरचा दबदबा वाढून राष्ट्रीय राजकारणात कॉँग्रेसला पर्याय ठरू पाहणाऱया ‘आप’ला रोखण्याचे आव्हान कॉँग्रेसपुढे आहे.

गोवा, मणिपूरमध्ये जनाधार घटला

गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये कॉँग्रेसचा जनाधार घटला आहे. गोव्यात 2017 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला 17 जागांवर विजय मिळाला होता, तर यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा जागा कमी झाल्या असून फक्त 11 उमेदवार विजयी झाले. मणिपूरमध्ये मागच्या वेळी 28 जागांवर विजय मिळाला होता. यावेळी काँग्रेसला फक्त 5 जागांवर विजय मिळाला आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसने मागच्या वेळीपेक्षा काहीशी चांगली कामगिरी केली असून 11 जागांवरून 19 जागांचा टप्पा गाठला आहे.

नेतृत्वबदलाची मागणी

पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल हे कॉँग्रेसला 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. पाच राज्यांतील 690 जागांपैकी काँग्रेसला विधानसभेच्या फक्त 55 जागा जिंकता आल्या. 403 जागांच्या उत्तर प्रदेशमध्ये दोनच जागा जिंकू शकला. त्यामुळे काँग्रेसजनांचा उद्वेग शिगेला पोहोचला आहे. काँग्रेसच्या हलाखीच्या अवस्थेविषयी गेल्या दीड वर्षापासून गंभीर चिंता व्यक्त करणाऱया जी-23 नेत्यांनीही काँग्रेस नेतृत्वासह कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याची गरज पुन्हा एकदा व्यक्त केली आहे.