
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 30 डिसेंबरला होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख जसजशी जवळ येतेयं तशी काँग्रेस-राष्ट्रवादीत मंत्रिपदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असले तरी त्यांच्याकडे कोणते खाते सोपवायचे यावरून राष्ट्रवादीत वाद निर्माण झाला आहे. तर काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, वर्षा गायकवाड यांची नावे जवळपास निश्चित असली तरी माजी मंत्री व युवा आमदार अशी रस्सीखेच सुरू आहे.
राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार याची यादी जवळपास अंतिम झाली असली तरी कोणते खाते कुणाकडे सोपवायचे यावरून मतभेद निर्माण झाले आहेत. महाविकास आघाडीची चर्चा सुरू असताना भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करणाऱया अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यास राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांचा विरोध आहे. मात्र अजितदादा समर्थक आमदारांच्या दबावामुळे त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद सोपविण्याचे जवळपास निश्चित झाले असले तरी त्यांच्याकडे महत्वाचे खाते देण्यास पक्षांतर्गत विरोध आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे कोणते खाते देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये माजी मंत्री व युवा आमदार असा वाद उफाळून आला असून हायकमांड कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश मंत्रिमंडळात होणार हे निश्चित असले तरी त्यांच्याकडे कोणते खाते सोपवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या वाटय़ाला आलेल्या खात्यांचा विचार करता महसूल खात्यासाठी थोरात, अशोक चव्हाण आग्रही असल्याचे समजते.
राष्ट्रवादीकडून वळसे-पाटील, मुंडे, मलिक, अनिल देशमुख यांना संधी
राष्ट्रवादीकडून अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, नवाब मलिक, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड, बबनदादा शिंदे, प्रकाश सोळुंखे, संग्राम जगताप यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. याशिवाय मकरंद पाटील, आदिती तटकरे यांच्या नावाची देखील राष्ट्रवादीत चर्चा आहे.
काँग्रेसकडून अशोक चव्हाण, वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, सतेज पाटील चर्चेत
काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, माणिकराव ठाकरे, के.सी.पडवी, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमिन पटेल यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. सुनील केदार, नसीम खान, प्रणिती शिंदे यांची नावे चर्चेत आहे.






























































