विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जोरबैठका, एकत्रितपणे निवडणूक लढण्याचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad-pawar-and-ashok-chavan
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीने महाआघाडीतील घटकपक्षांसोबत अन्य मित्रांसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांच्या मतांची विभागणी होऊ नये यासाठी समाजवादी पार्टी, सीपीआय या पक्षांना सोबत घेऊन एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या महाआघाडीच्या बैठकीत घेण्यात आला.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवास्थानी पार पडली. या बैठकीस काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, बविआचे हितेंद्र ठाकूर, सपाचे अबू आझमी, युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा, शेकापचे जयंत पाटील, सीपीआयचे प्रकाश रेड्डी आदी उपस्थित होते.

विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने झालेल्या महाआघाडीच्या पहिल्या बैठकीत आगामी निवडणूक सर्वांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेण्यात आला. ही पहिली बैठक होती. यापुढील काळात अशा बैठका होतच राहतील असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ज्या आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. विखे-पाटील यांच्यासोबत अन्य कुणी आमदार भाजपात जातील असे वाटत नसल्याचे चव्हाण म्हणाले.

लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूकही एकत्रितपणे आघाडी करून लढण्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीत एकमत आहे. भाजप सरकारविरोधात सपा, सीपीआय यासारखे घटकपक्षही महाआघाडी म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढण्यास तयार आहेत. वंचित बहुजन आघाडीनेही यामध्ये सहभागी व्हावे असे आम्हाला वाटते, मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला प्रतिसाद लक्षात घेता त्यावर अजून चर्चा झालेली नाही, तसेच मनसेबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी सांगितले.