काँग्रेस-राष्ट्रवादी  व मित्रपक्षांची बुधवारी नांदेडमध्ये पहिली संयुक्त प्रचार सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड 

लोकसभा निवडणुका जाहिर होण्यासाठी आता काही आठवडे शिल्लक असतांना मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या आघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली आहे. या आघाडीची पहिली संयुक्त प्रचार  सभा नांदेडमध्ये बुधवारी आयोजित केली आहे.

येथील स्टेडियम परिसरातील इंदिरा गांधी मैदानावर बुधवारी सायंकाळी 5 वाजता आयोजित केलेल्या या संयुक्त प्रचार सभेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदंचद्र पवार, महाराष्ट्राचे प्रभारी व लोकसभेतील काँग्रेसचे नेते खा.मल्लीकार्जुन खरगे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण,  पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जोगेंद्र कवाडे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर,  माजी उप मुख्यमंत्री छगन भूजबळ,  विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींची उपस्थिती लाभणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांची राज्यातील ही पहिलीच संयुक्त प्रचार सभा असल्यामुळे या सभेची नांदेडमध्ये तयारी सुरु करण्यात आली आहे. या सभेनंतर 23 रोजी परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अशाच पध्दतीने सर्वपक्षीय प्रचार सभा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येणार आहे.