
गेली पाच वर्षं सत्तेऐवजी पराभवाची नामुष्की ओढवलेल्या काँग्रेसची आर्थिक स्थिती वाईट आहे. कारण पक्षाने आपल्या पदाधिकाऱ्यांच्या खर्चावर नियंत्रण आणण्याचे आदेश दिले आहेत.
आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसने त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या चहा नाश्त्याच्या खर्चाची मर्यादा प्रतिमहिने तीन हजार केली आहे. जर यापेक्षा जास्त खर्च झाला तर तो संबंधित पदाधिकाऱ्याला करावा लागेल, असे आदेश पक्षातर्फे देण्यात आले आहेत. यापूर्वी पक्षातील नेते आणि अन्य पदाधिकाऱ्यांसाठी जो नाश्ता दिला जात होता, त्याच्या बिलावर संबंधित अधिकाऱ्याला फक्त स्वाक्षरी करावी लागत होती. त्यानंतर पक्षाच्या लेखापाल विभागाकडून ती बिलं चुकती करण्यात येत असत. मात्र, या प्रक्रियेला फाटा देत काँग्रेसने आता खर्चाची मर्यादा आखून दिली आहे.
तसंच, पक्षाने नेत्यांना कमी अंतरासाठी ट्रेनने प्रवास करण्यास सांगितलं आहे. तसंच गरज नसेल तर हॉटेल बुकिंग करणंही टाळण्याचे आदेश आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार, काँग्रेसला 55.36 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. तर पक्षाच्या संपत्तीत 2017-18 या वर्षात 15 टक्के घट झाली आहे. 2017मध्ये काँग्रेसकडे 854 कोटींची संपत्ती होती तर 2018मध्ये हा आकडा 754वर आला होता. पक्ष सध्या आर्थिक तंगीतून जात असल्याने चहापानासारख्या गोष्टींवर वायफळ खर्च टाळण्याचे आदेश देण्यात आले आहे.



























































