
काँग्रेसने स्वच्छ हवेसाठी रविवारी मरिन ड्राईव्ह परिसरात आंदोलन केले. मुंबईची हवा विषारी होणे हा निसर्गाचा दोष नाही तर भ्रष्ट, बेजबाबदार, संधीसाधू सरकारचे दुर्लक्ष, निष्काळजीपणा आणि प्रयत्नांच्या अभावाचा परिणाम आहे, अशी टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली. काँग्रेस कार्यकर्ते तोंडावर मास्क लावून आंदोलनात सहभागी झाले.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यू. बी. व्यंकटेश, माजी मंत्री आमदार अस्लम शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, आमदार अमिन पटेल, डॉ. ज्योती गायकवाड, माजी आमदार मधू चव्हाण, प्रणिल नायर, प्रवत्ते सुरेशचंद्र राजहंस आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रदूषणविरोधी जाहीरनामा
मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. याचदरम्यान वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासंबंधी मुंबई काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. पालिकेच्या धोरणात ‘स्वच्छ हवा हा प्रत्येक मुंबईकराचा मूलभूत हक्क’ अशी औपचारिक तरतूद केली जाईल, प्रत्येक वॉर्डसाठी प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा तयार केली जाईल आदी आश्वासने या जाहीरनाम्याद्वारे देण्यात आली.



























































