
अलीकडेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरीचा आरोप केला होता. यावर आज पत्रकार परिषद घेत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयोग आणि मतदार यादीबाबत त्यांनी (राहुल गांधी) केलेले आरोप निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले. तसेच ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांना सात दिवसांच्या आत आपल्या दाव्यांचा पुरावा म्हणून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे किंवा संपूर्ण देशाची माफी मागण्याचे आव्हान केले आहे. यावर आता काँग्रेसने निवडणूक आयोगाला प्रत्युत्तर देत सवाल विचारला आहे की, तुम्ही राहुल गांधींकडे प्रतिज्ञापत्र मागता, पण अनुराग ठाकूर यांच्याकडून का नाही?
याबद्दल बोलताना काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले आहेत की, “देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेतली, पण त्यांचे शब्द आणि त्यांची स्क्रिप्ट भाजपची होती. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी आणि एसआयआरबद्दल अनेक प्रश्न विचारले, पण तुम्ही उत्तर दिले नाही. निवडणूक आयोगाने ज्यांना मृत घोषित केले ते लोक राहुल गांधींसोबत चहा पीत होते.”
निवडणूक आयोगाला विचारले दोन प्रश्न
जर सीसीटीव्ही फुटेज गोपनीयतेचे उल्लंघन करत असेल, तर सीसीटीव्ही का असावेत? तुम्ही राहुल गांधींकडे प्रतिज्ञापत्र मागता, पण अनुराग ठाकूर यांच्याकडून का नाही? हे दोन प्रश्न त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाला विचारले आहेत. पवन खेरा म्हणाले की, ज्ञानेश कुमार गुप्ता जी, तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून लोकशाहीची हत्या करणारे आम्ही नाही तर, नरेंद्र मोदी आहोत. आमची विनंती आहे की, या हत्येत सहभागी होऊ नका.