
सुशांतसिंहचा मित्र चित्रपट निर्माता संदीप सिंह आणि भाजप यावरून काँग्रेस आक्रमक झाली असून सुशांतच्या आत्महत्येनंतर संदीप सिंह याने भाजपच्या कुठल्या नेत्याला ब्रिफिंग केले होते? संदीपने गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्र भाजप कार्यालयात 53 कॉल केले. तो कुणाकडून सुरक्षा मागत होता, अशा प्रश्नांची सरबत्तीच काँग्रेसने केली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर हल्लाबोल केला. संदीपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवला आणि पोस्टर लाँचिंगला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. याचाच अर्थ संदीप सिंह ही काही सर्वसाधारण व्यक्ती नाही. त्याचे संबंध भाजपात कुणाशी जुळलेले आहेत याचे उत्तर देशाला हवे आहे, असे सिंघवी म्हणाले. कोण आहे तो नेता याचे उत्तर फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी द्यावे, असेही ते म्हणाले.
संदीप सिंहची लिजंड ग्लोबल स्टुडिओ ही कंपनी तोटय़ात असतानाही 2019 मध्ये त्याच्याशी ‘व्हायब्रंट गुजरात’चा 177 कोटींचा करार कसा झाला? त्याला चरित्रपटाचे कंत्राट कसे मिळाले? असे प्रश्नही सिंघवी यांनी विचारले आहेत.
काँग्रेसचे सवाल
तोट्यातील संदीप सिंहला व्हायब्रंट गुजरातचे कंत्राट कसे मिळाले? मोदींच्या बायोपिकच्या बदल्यात हा करार झाला का?
संदीपने भाजप कार्यालयात 53 फोन कोणाला केले होते?
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर मोठा आरोप केला असून सुशांतच्या आत्महत्येनंतर संदीप सिंह याने भाजपच्या एका नेत्याला भेटून याबाबत ब्रिफिंग दिले होते. हा नेता नेमका कोण याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. संदीप सिंह आणि भाजप यांच्यातील ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ असा तिरकस सवालही त्यांनी विचारला आहे.




























































