काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी यांचे निधन, टीव्हीवरील लाईव्ह चर्चेनंतर घरातच कोसळले

2536

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी यांचे निधन झाले आहे. लाईव्ह शो नंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि ते घरातच कोसळले. त्यांना तात्काळ गाझियाबाद येथील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे समजते.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, आज सायंकाळपर्यंत त्यागी यांची तब्येत व्यवस्थित होती. आज तकच्या चर्चा सत्रातही ते सहभागी झाले होते. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली होती. मात्र चर्चा सत्रानंतर अचानक त्यांची तब्येत खराब झाली आणि ते बेशुद्ध झाले. बेशुद्ध अवस्थेत त्यांना यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून राजीव त्यागी यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले आहे. ‘राजीव त्यागी यांच्या अचानक निधनामुळे सर्व खूप दुःखी आहेत. ते कट्टर काँग्रेसी आणि देशप्रेमी होते. या दुःखद प्रसंगी काँग्रेस पक्षाच्या सहवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत’, असे ट्विट काँग्रेसने केले आहे.

भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांनीही ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या